5261
चंदगड : तहसीलदार राजेश चव्हाण, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व शीतल पाटील यांच्याकडे निवेदन देताना शेतकरी.
--------------------------
चंदगडला शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा
वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान ः २२ ला मुख्य वनसंरक्षकांच्या उपस्थितीत होणार बैठक
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ : वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्याच्या सर्व भागांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत आज येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पूर्वसूचना देऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर २२ एप्रिलला येथील तहसील कार्यालयात मुख्य वनसंरक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
रवळनाथ मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून पंचायत समितीमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. ॲड. संतोष मळवीकर यांनी मोर्चा काढण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. शासनाकडे दहा मागण्या केल्या असून, त्याबाबत काय निर्णय घेण्यात आला याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावेळी चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व पाटणे विभागाच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी शासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसून वरिष्ठ अधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली. पूर्वसूचना देऊनही ते हजर राहत नसतील तर शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळला जातो का, असा प्रश्न केला. उपस्थित आंदोलकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना बोलण्यास मज्जाव केला. त्यावर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी मध्यस्थी करीत संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची चर्चा करून निर्णय सांगावा, अशी सूचना केली. त्यासाठी वेळ मागून घेण्यात आली. त्यावर गायकवाड व पाटील यांनी वरिष्ठांनी चर्चा केली आणि २२ एप्रिलला येथील तहसील कार्यालयात मुख्य वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे मान्य केले. नितीन पाटील, कृष्णा पाटील, भरमाण्णा गावडे, बाबूराव हळदणकर, शिवसेनेचे सुनील शिंत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, सुखदेव शहापूरकर, पांडुरंग बेनके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
.........
चौकट...
आमदारांकडून पोटतिडकीने काम....
आमदार शिवाजी पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या पाटील यांना शेतीच्या समस्यांची जाण असून, त्यांच्याकडून पोटतिडकीने काम सुरू असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले.