आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात तगडा संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात आहे. पण या संघाची स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. राजस्थान रॉयल्स संघाने तर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीच्या चिंध्या केल्या. तर आरसीबीनेही गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत 240 धावांचा पल्ला गाठला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 222 धावा केल्या. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्दिक पांड्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव निश्चित झाल्याचं त्याने सांगितलं. नेमकं हार्दिक पांड्याचं काय चुकलं? आर अश्विनने हार्दिक पांड्याच्या कोणत्या निर्णयावर बोट ठेवलं? ते जाणून घेऊयात.
आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेवर आयपीएल स्पर्धेत आरसीबी विरुद्ध हार्दिक पांड्याच्या निर्णयावर टीका करताना सांगितलं की, रजत पाटीदारचा फिरकीपटूंविरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. रजत पाटीदार जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा हार्दिकने लगेचच चेंडू मयंक मार्केंडेयकडे सोपवला. आर अश्विन म्हणाला की, ‘रजत पाटीदार फिरकी गोलंदाजांना मोठे फटके मारतो. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा हार्दिकने चेंडू सरळ मयंक मार्केंडेयकडे दिला.’
आर अश्विनने पुढे सांगितलं की, ‘आम्हाला यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल की मयंक मर्केंडेयच्या डोक्यात काय सुरू असेल. हैदराबादमदध्ये पाटीदारने त्याला स्थिती वाईट केली होती. पाटीदार फलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडे चेंडू सोपवला. हा निर्णय खूपच वाईट होता. माझं डोकं फिरलं. 210 आणि 240 मध्ये फरक असतो. मुंबईच्या फिरकीपटूंनी 6 षटकात 80 धावा दिल्या.’
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची या पर्वात नाजूक स्थिती आहे. जसप्रीत बुमराहाला देखील विकेट मिळत नाही. शार्दुल ठाकुरने 13.45 च्या इकोनॉमीने, ट्रेंट बोल्टने 12.22 इकोनॉमीने धावा दिल्या. अल्लाह गजनफर आणि मिचेल सँटनरची गोलंदाजीही प्रभावी ठरली नाही. त्यामुळे संघाचा पूर्ण भार आता फलंदाजांवर पडला आहे. 240 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 222 धावा केल्या. 18 धावांनी पराभव झाला, पण याच धावा गोलंदाजांनी रोखल्या असत्या तर चित्र वेगळं असतं.