पुणे - राज्यातील उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला असून काही जिल्हे हे अति-उच्च उष्णता धोका श्रेणीत तर काहींचा उच्च जोखीम श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर’ या संस्थेकडून हा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा येथे गुरुवारी (ता. १६) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. परिणामी या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, आज विदर्भातील अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तासांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढेल, असा अंदाज आहे. दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गुरुवारी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात लोहगाव, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यासह अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ येथील तापमानाचा पारा चढता असल्याचे दिसून येते.
यामुळे वाढली उष्णता
कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या समुद्रसपाटीवर वातावरणाच्या मधल्या थरात निर्माण झालेल्या प्रति चक्रीय स्थितीमुळे (ॲन्टी सायक्लॉन) उष्णतेची तीव्रता वाढत आहे. उत्तर कर्नाटकावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे.
विभागनिहाय असे राहणार हवामान
- विदर्भ : बुधवार (ता. १५) ते रविवारपर्यंत (ता. १९) उष्णतेच्या लाटेची स्थिती
- मध्य महाराष्ट्र : बुधवार (ता. १५) ते शनिवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची लाट
- मराठवाडा : गुरुवार (ता. १६) ते शनिवार (ता. १८) दरम्यान उष्णतेची लाट
पुणे जिल्ह्यात तापमान चाळीशीपार
पुण्यात बुधवारी (ता. १५) ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये ३९.२, कोरेगाव पार्क ३९.३, मगरपट्टा ३९.६, हडपसर ३८.५, वडगाव शेरी ३८.८, चिंचवडमध्ये ३८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील पुरंदर ४०.४, लवळे ४०.४ आणि बारामती ४०.२ येथे कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली होती. दरम्यान, पुणे आणि आसपासच्या परिसरात गुरुवार (ता. १६) ते शनिवार (ता. १८) दरम्यान कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.