Shirur Crime News: शिरूर नशामुक्तीसाठी तहसिलसमोर सत्याग्रह; वाढत्या गुन्हेगारी, एमडी व अवैध धंद्यांविरोधात नीलेश वाळूंज आक्रमक
esakal April 16, 2026 03:45 AM

शिरूर : शिरूर शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी, तरूणाई भोवतीचा एमडी या अंमली पदार्थाचा विळखा, हातभट्टी दारूचे पेव, अवैध धंदे, जुगार, मटका, चोऱ्या, दादागिरी, भाईगिरी आणि वाढत्या गुन्हेगारीकडे शासनाचे व विशेषतः पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कायदा - सुव्यवस्था राखण्याकामी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीच्या मागणीसाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळूंज यांनी बुधवार (ता. १५) पासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले. शिरूर तालुका नशामुक्त करण्याबरोबरच, कायदा - सुव्यवस्था राखण्याकामी ठोस उपाययोजना लागू होईपर्यंत हा सत्याग्रह चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यापूर्वी श्री. वाळूंज यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन त्यांच्याशी सत्याग्रह आंदोलनाबाबत चर्चा केली. गेल्या काही दिवसांत शिरूर पोलिस ठाण्यातील कामगिरी निराशाजनक असून, शहर व ग्रामीण भागात चोऱ्या, अवैध धंदे बोकाळले आहेत. पोलिसांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचा आरोप वाळूंज यांनी केला. बालगुन्हेगारांचे प्रमाण चिंताजनक असून, यात सर्वच जबाबदार समाजघटकांनी लक्ष न घातल्यास समाजव्यवस्था बिघडू किंवा उध्वस्त होऊ शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. शिरूर पोलिस ठाण्यासमोर झालेल्या राड्याची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

अवैध धंद्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र भरारी पथक नेमावे, गुन्हेगारी व अवैध दारू प्रकरणी नियंत्रणासाठी नियुक्त असलेल्या तालुकास्तरीय समितीच्या नियमीत बैठका घ्याव्यात व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करावी, दारू, ताडी, गुटखा विक्रीवर, मटका व जुगार धंद्यावर कारवाई करावी, पोलिस ठाण्यात अवैध धंदेवाले व दोन नंबरवाल्यांची सरबराई थांबावी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी रिक्त जागा भराव्यात, पोलिस ठाण्यांतर्गत नियमीत कामे व गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र रचना करावी आदी या आंदोलनातील मागण्या आहेत.

गेल्या काही दिवसांत शिरूर तालुक्यात सुमारे वीस कोटी रूपयांहून अधिकचे एमडी जप्त केले असून, यातील प्रत्येक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मास्टरमाईंड शोधून काढावेत. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हद्दीत या कारवाया झाल्या त्यांना जबाबदार धरावे. तालुका अंमली पदार्थांपासून मुक्त करावा.

नीलेश मंदा यशवंत वाळूंज सामाजिक कार्यकर्ते

सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या

  • एक गाव एक पोलिस अंमलदार योजना प्रभावीपणे राबवावी.

  • शिरूर साठी कर्तव्यदक्ष डीवायएसपी व पोलिस निरीक्षकाची नेमणूक करावी.

  • शिरूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे.

  • अण्णापूर गाव टाकळी हाजी दूरक्षेत्राऐवजी शिरूरला जोडावे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.