पुणे - शहरात वाहिनीद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवीन जोड घेण्यास अभूतपूर्व वेग आला आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल १४ हजारांहून अधिक नव्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दरमहा सरासरी पाच हजार जोडण्या घेतल्या जात होत्या. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे ही संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडूनही (एमएनजीएल) पुरवठाक्षमता वाढविण्यात आली आहे.
‘पीएनजी’ जोडणी घेणे बंधनकारक केल्याने त्याचा परिणाम मागणीवर दिसून आला आहे. पूर्वी सोसायट्यांमध्ये सुविधा असूनही अनेकजण जोडणी घेण्यास टाळाटाळ करत होते. मात्र आता मोठ्या प्रमाणावर ग्राहक पुढे आले आहेत. त्यामुळे ‘पीएनजी’चा वापर वाढला असून गॅस वितरण व्यवस्था अधिक परिणामकारक झाली आहे.
PNG Gas connection
अनेक सोसायट्यांमध्ये सुविधा उपलब्ध असूनही पूर्वी केवळ ५० टक्के रहिवासीच जोडणी घेत होते. आता मात्र हे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. वाढती जागरूकता, सुरक्षिततेची खात्री आणि वापरातील सोय या कारणांमुळे नागरिक ‘पीएनजी’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वाहिनीद्वारे पुरवठा होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा पर्याय अधिक विश्वासार्ह मानला जात आहे. शहरातील नव्या प्रकल्पांमध्ये तर ‘पीएनजी’ सुविधा बंधनकारक करण्यात येत असल्याने नवीन ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
यासाठी जोडणी बंधनकारक
‘पीएनजी’ जोडणी बंधनकारक करण्यामागे सुरक्षितता आणि शाश्वत ऊर्जा वापर हे दोन प्रमुख उद्देश आहेत. सिलिंडरच्या तुलनेत वाहिनीद्वारे गॅसपुरवठा अधिक सुरक्षित मानला जातो, कारण गळती किंवा साठवणुकीशी संबंधित धोके कमी होतात. याशिवाय नैसर्गिक गॅस हा स्वच्छ इंधन प्रकार असल्याने पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘पीएनजी’चा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर आहे.
वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. नवीन वाहिनी टाकणे, दाब नियंत्रक यंत्रणा सुधारणे आणि सेवा केंद्रांची संख्या वाढवणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना जलदगतीने जोडण्या देणे शक्य होत आहे.
- वरिष्ठ अधिकारी, एमएनजीएल
आधी सिलिंडरवर अवलंबून राहावे लागायचे. अनेकदा अचानक गॅस संपल्यामुळे अडचण येत होती. आता ‘पीएनजी’ घेतल्यामुळे ही समस्या पूर्णपणे दूर झाली आहे. वापरही सोपा आहे आणि सुरक्षिततेबाबतही समाधान वाटते.
- अमोल देशमुख, रहिवासी, कर्वेनगर