मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ‘या’ कालावधीत राहणार तात्पुरती बंद, दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
इशान देशमुख April 22, 2026 09:43 AM

Pune-Mumbai Expressway मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून (Pune-Mumbai Expressway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गवरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी या कामासाठी द्रुतगती मार्गावरील (Pune-Mumbai Expressway News) वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गुरूवार (23 एप्रिल) आणि शुक्रवार (24 एप्रिल) या दोन दिवस वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काही तांत्रिक कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. या कामांमुळे दुपारी तीन तास महामार्गावरील (Pune-Mumbai Expressway) वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गावरील कामे सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच मार्गस्थ व्हावे, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे.

Pune-Mumbai Expressway News : वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारी वाहतूक दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड – तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील. तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.