आता धडा शिकविण्याची योग्य वेळ; रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर मनसे ठाम, आता रिक्षावर स्टिकर लावणार, 'मी मराठी बोलतो...'
अजय माने April 22, 2026 01:13 PM

Marathi Language Taxi And Rickshaw Licenses मुंबई: आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. यावरून मनसेने देखील मराठी बोलण्याला पाठिंबा देत दुमराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येत आहेत, मी मराठी बोलतो माझ्या रिक्षात बसा, असे स्टिकर लावण्यात येत असल्याचे मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Sandeep Deshpande : रिक्षावाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात

मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मला मराठी येते अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर आजपासून झळकणार आहेत. मराठी बोलणाऱ्या आणि मराठी कळणार या रिक्षा चालकांनी मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात सहभागी होऊ नये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाहन केले आहे.

Sandeep Deshpande : हिंमत दाखवावी क्लॅशेस करायची...

याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, संजय नाईक यांच्या नेतृत्वात उपनगरातील रिक्षाचालक आहेत, त्यांच्या उपस्थित आम्ही कार्यक्रम घेतला आहे. उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येत आहे. मी मराठी बोलतो माझ्या रिक्षात बसा. आता धडा शिकविण्याची योग्य वेळ आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा संपाला पाठिंबा देणार नाही. रस्त्यावर रिक्षा चालू राहतील. जे अमराठी लोक आहेत त्यांनी हिंमत दाखवावी क्लॅशेस करायची. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सगळेच मराठी भाग आहे. सदावर्तेंबाबत काय बोलू नका, आक्रमक होऊन घरात बसतात. सगळ्यांनी मराठी बोलावं. हम को मराठी नही आता, हिंदी मै बोलो असे चालणार नाही. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तेथील भाषा यायला हवी. इतर देशात तेथील भाषा शिकल्याशिवाय जॉब मिळत नाही, महाराष्ट्राने काय पाप केले आहे मग? आमची शिकवायची पद्धत वेगळी आहे, प्रताप सरनाईक शिकवतील. हा नियम खूप आधीचा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा यायला हवी. हा निर्णय गुजरात आणि इतर राज्यमध्ये ही आहे, असंही पुढे संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.

Marathi Language Taxi And Rickshaw Licenses  : राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे- प्रताप सरनाईक 

ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.

Marathi Language Taxi And Rickshaw Licenses : मराठी येणं अनिवार्य

मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा मुद्दा पुढे आला. काही परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.