तब्बल 22 वर्षांनंतर सचिन पिळगांवकर-मधुराणी गोखले एकत्र; हिरोचं नाव ऐकून व्हाल चकीत!
admin April 22, 2026 01:25 PM
[ad_1]

चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो? या हिरोचं नाव आहे ‘कापूसकोंडा’. हा एक गोंडस श्वान आहे आणि हेच या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले एकत्र दिसले होते. आता तब्बल 22 वर्षांनंतर ‘कापूसकोंडा’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा दोघं एकत्र आले आहेत. बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे.

जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिलं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आलं आहे.

‘कापूसकोंडा’ चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर प्रेरित आहे. चित्रपटाचा खरा हिरो हा पोस्टरवर दिसत असलेला एक ‘कुत्रा’ असून चित्रपटाचे रंजक कथानक हे एका फॅमिली आणि त्या कुत्र्याच्या भोवती गुंफण्यात आलं आहे. मानवी नातेसंबंध, कुटुंब, भाव-भावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. म्हणूनच या चित्रपटाला ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.

“या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळं आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असं कथानक मी कधी केलं नाही. माझ्या भावनांसोबत या चित्रपटाचं कथानक मिळतंजुळतं असल्याचं मला जाणवलं. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला,” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.

तर अभिनेत्री मधुराणी गोखले या चित्रपटाविषयी म्हणाली, “लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी या चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली. सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खूपच वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी 22 वर्षांनी मिळणार होती. सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या.”


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.