पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात झेल पकडण्याच्या प्रयत्नात लुंगी ngidi भीषण जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून तो जमिनीवरून उठूही शकत नव्हता. अखेर त्याला स्ट्रेचरवर झोपवून मैदानाबाहेर नेण्यात आले आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) थेट मैदानावरच बोलवावी लागली. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अक्षर पटेलने टाकलेल्या तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्याने समोरच्या दिशेने जोरात शॉट मारला. हा शॉट नीट बसला नाही आणि चेंडू मिड-ऑफच्या दिशेने हवेत गेला. ३० यार्डच्या आत उभ्या असलेल्या लुंगी एनगिडीने मागे पळत (Back pedal) झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी तो उलटा पडला. तो इतक्या वाईट पद्धतीने पडला की त्याच्या डोक्याला आणि मानेला जोराचा मार लागला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो एका प्रेक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २६४ धावा केल्या, जे आयपीएल इतिहासातील पाचवे सर्वात मोठे टोटल ठरले आहे. केएल राहुलने १५२ धावांची ऐतिहासिक खेळी केली. आयपीएलमध्ये १५० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे, तर एकूण यादीत असा विक्रम करणारा तो जगातील तिसरा फलंदाज आहे.
केएल राहुलने ६७ चेंडूंमध्ये ९ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने नाबाद १५२ धावा ठोकल्या. नितीश राणानेही ९१ धावांची स्फोटक खेळी केली, मात्र त्याचे शतक थोडक्यात हुकले. ४४ चेंडूंच्या या खेळीत त्याने ४ षटकार आणि ११ चौकार लगावले.
विजयाचा पाठलाग करताना प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी १२६ धावांची भागीदारी करून पंजाब किंग्सला शानदार सुरुवात करून दिली. ६.५ षटकांत १२६ धावांच्या धावसंख्येवर पंजाबची पहिली विकेट पडली. प्रियांशने १७ चेंडूंमध्ये ४३ आणि प्रभसिमरनने २६ चेंडूंमध्ये ७६ धावांची वादळी खेळी केली. पंजाबने केवळ १४.२ षटकांतच २०० धावांचा टप्पा ओलांडला होता.