डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील एक संभाव्य जोखीम म्हणजे फंड मॅनेजर आणि त्याच्या टीमने घेतलेल्या भावनिक निर्णयांचे परिणाम. काही वेळा शेअर बाजार तत्कालिक कारणांमुळे कोसळतो किंवा वेगाने वर जातो. अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक विकण्याचे किंवा खरेदी करण्याचे निर्णय घेतले जातात का, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येऊ शकतो. खरं तर, अशा भावनांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत अजिबात जागा नसावी. मात्र, तरीदेखील भावनांच्या पलीकडे जाऊन केवळ आकडेवारीच्या आधारावर गुंतवणुकीचे निर्णय घेणारी एखादी यंत्रणा असेल, तर ती अधिक चांगली ठरेल, असे काही गुंतवणूकदारांना वाटते. अशा गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक बॉक्स’ ही म्युच्युअल फंडातील एक महत्त्वाची यंत्रणा आहे.
‘ब्लॅक बॉक्स’च्या कामाची पद्धत
ब्लॅक बॉक्स ही यंत्रणा प्रामुख्याने प्रगत अल्गोरिदम आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित असते. ही प्रक्रिया सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करण्यापासून सुरू होते. यात शेअर बाजारातील विविध शेअरचे सध्याचे बाजारभाव, संबंधित कंपन्यांचे आर्थिक अहवाल, जागतिक आर्थिक घडामोडी, महागाई आणि व्याजदर यांचा समावेश होतो.
यानंतर हा डेटा अत्याधुनिक मॉडेल आणि संगणकीय अल्गोरिदमच्या मदतीने विश्लेषित केला जातो आणि त्यातून संभाव्य गुंतवणूक संधी शोधल्या जातात. हे निर्णय पूर्णपणे डेटा-आधारित असल्यामुळे त्यात मानवी भावना किंवा अंदाजाचा प्रभाव तुलनेने कमी असतो.
पुढील टप्प्यात हे निर्णय बाजारात अंमलात आणले जातात आणि फंडाचा पोर्टफोलिओ सतत अद्ययावत केला जातो. या यंत्रणेचा वापर करून गुंतवणूक करणाऱ्या फंडांना ‘क्वांट फंड’ (Quant Fund) असे म्हणतात, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने गुंतवणूक करणारे फंड.
गुंतवणूकदाराने काय करावे?
गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादा क्वांट फंड समाविष्ट करणे योग्य ठरू शकते, कारण या पद्धतीमुळे डेटा-आधारित निर्णयांचा फायदा मिळतो. मात्र, सर्व गुंतवणूक अशा फंडांमध्येच करणे टाळावे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही केवळ आकड्यांचा खेळ नसून, त्यात मानवी अनुभव, बाजारातील बदलांचे आकलन आणि भावनांचा योग्य समतोल आवश्यक असतो. क्वांट मॉडेल अनेकदा ऐतिहासिक डेटावर आधारित असतात, त्यामुळे अचानक उद्भवलेल्या परिस्थितींमध्ये त्यांच्या मर्यादा दिसून येऊ शकतात.
वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे पाहिल्यास असेही दिसून येते, की काही पारंपरिक फंडांनी दीर्घकालावधीत क्वांट फंडांपेक्षा अधिक स्थिर आणि चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन साधण्यासाठी इतर म्युच्युअल फंडांसोबत एखादा क्वांट फंड ठेवणे हे योग्य धोरण ठरू शकते.
फायदे आणि मर्यादा
ब्लॅक बॉक्स ही यंत्रणा अतिशय वेगवान आणि तांत्रिक असल्यामुळे प्रभावी ठरते. गुंतवणुकीचे निर्णय अधिक अचूक घेतले जातात. यामुळे भावनात्मक निर्णय कमी होतात आणि दीर्घकालीन परताव्याची शक्यता वाढते.
गुंतवणूकदाराला स्वतः बाजाराचा सतत अभ्यास करण्याची गरज राहत नाही, त्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते. तसेच, मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण करून विविध क्षेत्रांत गुंतवणूक केल्याने जोखीम कमी करण्यास मदत होते. थोडक्यात, ही यंत्रणा कार्यक्षम आणि व्यावसायिक पद्धतीने म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करते.
याच्या काही मर्यादाही आहेत. सर्वांत मोठी मर्यादा म्हणजे पारदर्शकतेचा अभाव, कारण गुंतवणूकदाराला निर्णयप्रक्रिया स्पष्टपणे समजत नाही. वापरले जाणारे अल्गोरिदम आणि मॉडेल गुंतागुंतीचे असल्यामुळे ते समजणे अवघड जाते.
चुकीचा किंवा अपूर्ण डेटा असल्यास निर्णय चुकू शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. तसेच, बाजारातील अचानक बदलांना काही वेळा ही यंत्रणा योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. या प्रक्रियेत गुंतवणूकदाराचा थेट सहभाग कमी असल्यामुळे निर्णयांवर त्याचा प्रभाव राहत नाही. त्यामुळे जोखीम पूर्णपणे टाळता येत नाही.