म्युच्युअल फंड : थीम आणि बाँडचा स्मार्ट मिलाफ
esakal April 27, 2026 07:45 AM

अनिल बुटले, म्युच्युअल फंड वितरक

पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, बाजारात सुरू असलेले दीर्घकालीन करेक्शन आणि वाजवी मूल्यांकनाच्या सध्याच्या परिस्थितीत, व्यापक परिस्थितीशी सुसंगत अशा संकल्पनांवर बाजी लावणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळण्याची आशा आहे. अगदी सर्वसामान्य परिस्थितीतही प्रचलित बाजारातील जोखमींचा अंदाज घेऊन डेट पोझिशनची जोड दिलेल्या संकल्पनात्मक (थीमॅटिक) गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओच्या कामगिरीला उठाव मिळू शकतो.

संकल्पना (थीम) म्हणजे एखाद्या समान कल्पना किंवा संधीच्या अंतर्गत संबंधित क्षेत्र किंवा शेअरचे मिश्रण. थीमॅटिक गुंतवणुकीत एका विशिष्ट प्रक्रियाकेंद्रित दृष्टिकोनाची गरज असते जेणेकरून सुयोग्य संधी निश्चित करता येतील. सर्वांत प्रथम म्हणजे व्यापक संकेतांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी ‘जीडीपी’तील वाढ, वित्तीय तूट, चालू लेखा तूट, चलनवाढ, व्याजदर, सध्याच्या हालचाली, कच्चे तेल व अन्य जिनसांच्या किमती आणि भू-राजकीय पैलूंचा विचार करावाच लागतो. त्यातून विशिष्ट वातावरणात काही संकल्पनांचा लाभ कसा होईल, याचा निर्णय घेता येतो.

मूल्यमापन आवश्यक

एकदा क्षेत्र किंवा संकल्पना निश्चित झाल्या, की त्यांच्या दीर्घकालीन सरासरीच्या तसेच व्यापक बाजाराच्या तुलनेत त्यांच्या मूल्यांकनाचे विश्लेषण व मूल्यमापन करावेच लागते. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक किंमत द्यावी लागत नाही. सरतेशेवटी, व्यापक संकेत व मूल्यांकनाच्या आधारे, योग्य त्या क्षेत्र किंवा संकल्पनांची निवड करावी लागते आणि त्यानुसार त्यांचे प्रमाण ठरविण्यात येेते. यातून बाहेर पडण्याचे धोरण (एक्झिट स्ट्रॅटेजी) ठरवावे लागते आणि त्यानुसार निधीचे पुनर्वितरण करावे लागते. बाजारातील बदलत्या स्थितीनुसार ठराविक कालावधीने पुनर्संतुलन साधावे लागते. असे निर्णय घेण्याएवढा वेळ आणि कौशल्य छोट्या गुंतवणूकदारांकडे नसतो. बाजाराच्या चंचल स्थितीमध्ये ते भावनिक निर्णयाला बळी पडण्याचीही शक्यता असते. बाहेर पडण्याचे धोरण ठरविणे आणि करसुलभ पद्धतीने त्यावर अंमलबजावणी करणे या आव्हानांचाही सामना करावा लागतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.