शेअर बाजार : अदानी एनर्जी सोल्युशन्स
esakal April 27, 2026 07:45 AM

मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट

अदानी पोर्टफोलिओचा भाग असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लि. (AESL) ही ऊर्जा क्षेत्रातील वीज पारेषण, वितरण, स्मार्ट मीटरिंग आणि कुलिंग सोल्यूशन्स यांसारख्या विविध विभागात काम करणारी कंपनी आहे. ‘एईएसएल’ ही भारतातील सर्वांत मोठी खासगी पारेषण कंपनी आहे. कंपनीकडे ४८५ चौरस किलोमीटरचे वीज वितरण जाळे असून, ते महानगर मुंबई आणि मुंद्रा एसईझेड या औद्योगिक केंद्रातील १.२ कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनीने तीन नव्या क्षेत्रांमध्ये परवान्यांसाठी अर्ज केला आहे, ज्यात मुंबई आणि मुंद्रा ‘एसईझेड’मधील विद्यमान डिस्कॉमजवळची नवी मुंबई आणि कच्छ; तसेच पश्चिम उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद ते जेवर-बुलंदशहर यांचा समावेश आहे.

या लेखात आपण या शेअरच्या तांत्रिक विश्लेषणाचा तक्ता पाहू या. सोबत या शेअरचा साप्ताहिक कालावधीचा तक्ता दिला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जवळपास ४२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठल्यानंतर या शेअरच्या भावात एक मोठी घसरण बघण्यात आली होती. ही घसरण इतकी मोठी होती, की मार्च २०२३ मध्ये या शेअरचा भाव ६३० रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर गेले तीन वर्षे या शेअरचा भाव १३५० ते १०५० रुपये या पातळीतच फिरत राहिला. म्हणजे हा शेअर गेली तीन वर्ष कन्सॉलिडेशन झोनमध्ये होता आणि गेल्या शुक्रवारी या शेअरच्या भावाने मोठ्या संख्येच्या उलाढालीने या कन्सॉलिडेशन झोनची वरील पातळी तोडली आणि हा शेअर ‘एनएसई’वर १४२० रुपये भावाला बंद झाला. या प्रकारच्या तांत्रिक विश्लेषणाच्या नमुन्याला ‘वेज ब्रेकआऊट’ असे म्हणतात.

हा शेअर आता खरेदी करायला हवा. येणाऱ्या दीड ते दोन वर्षांत या शेअरचा भाव पुन्हा एकदा ४२०० रुपयांच्या पातळीपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. या ट्रेडसाठी साप्ताहिक पातळीवर १३०० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा.

(डिस्क्लेमर : या कंपनीमध्ये माझे कसलेही आर्थिक हितसंबंध नाहीत. या कंपनीमधून मला गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारचे कॉम्पेन्सेशन मिळालेले नाही. मी या कंपनीत कोणत्याही पदावर नाही किंवा माझी कोणत्याही प्रकारची भागीदारी नाही; तसेच कंपनीच्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये माझा कोणताही सहभाग नाही.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.