युद्धामुळे कंपन्यांवर अनिश्चिततेचे ढग
esakal April 27, 2026 09:45 PM

युद्धामुळे कंपन्यांवर अनिश्चिततेचे ढग
परिस्थिती पूर्ववत न झाल्यास ४० हजार कंपन्यांना टाळे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : इराण-अमेरिका युद्धाचा फटका भारतातील लघू आणि मध्यम उद्योगांना बसला असून, गॅस, काच आणि पेट्रोकेमिकल्सच्या तुटवड्यामुळे पुरवठा साखळी कोलमडली आहे. विशेषतः राज्यातील पुणे, ठाणे, नवी मुंबई, वाशी येथील कारखान्यांवर संकट कोसळले आहे. येत्या तीन महिन्यांत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास ४० हजार कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कच्चा माल न मिळाल्याने गॅस, पेट्रोकेमिल्स, काच आणि प्लॅस्टिकवर अवलंबून असणाऱ्या अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. कच्चा मालाच्या किमती वाढल्या असून तयार मालाला वाढीव दर मिळत नसल्याने उद्योजक अडचणीत सापडले आहेत. भारतातील ४० टक्के कंपन्या पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून आहेत. विशेषतः फार्मा कंपन्यांना काचेच्या बाटल्यांची आवश्यकता असते, मात्र त्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे प्लॅस्टिकच्या बॉटलसाठी आवश्यक रेझिन मिळत नसल्याने उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कित्येक कारखान्यांनी उत्पादन कमी केले असून, कामगार कपातही करण्यात आळी आहे. परिणामी या महिन्यात जीएसटी संकलन कमी होणार आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

मध्य पूर्व आशियातील युद्धामुळे पेट्रोकेमिकल्स तुटवडा आहे. लघू-मध्यम उद्योगांना आवश्यक गॅस, काच, प्लॅस्टिक अशा कच्चा मालाचा तुटवडा भासत आहे. जो माल मिळत आहे तो महाग आहे. तर विक्रीला वाढीव किंमत मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे. सरकारने योग्य पाऊल उचलले नाही तर येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात ४० हजार कंपन्या बंद होतील.
- चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.