आजच्या वेगवान युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, कामाच्या गडबडीत फोनची बॅटरी संपली की मोठी अडचण निर्माण होते. स्मार्टफोनचा वाढता वापर आणि चुकीच्या सवयी बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम करतात.
मग अशावेळी काही साधे बदल करुन तुम्ही तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे स्क्रीनच्या ब्राइटनेसची. कारण जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरी अत्यंत वेगाने खर्च होते. त्यामुळे वापरकर्त्यांनी स्क्रीनचा ब्राइटनेस गरजेनुसार कमी ठेवावा किंवा ऑटो-ब्राइटनेसचा पर्याय निवडावा.
तसेच जर तुम्ही फोन वापरत नसाल तर त्याची स्क्रीन लगेच बंद व्हावी यासाठी स्क्रीन टाइमआउटचा कालावधी १५ ते ३० सेकंदांच्या मर्यादेत ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.
दुसरीकडे स्मार्टफोनमधील अनेक ॲप्स आपण वापरत नसतानाही बॅकग्राउंडला सुरु असता. यातील डेटा तसेच लोकेशनमुळे बॅटरी जास्त संपते. अशावेळी या अनावश्यक ॲप्सची बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी बंद केल्यास बॅटरी वाचण्यास मोठी मदत होते.
याशिवाय ब्लूटूथ, वाय-फाय आणि लोकेशन यांसारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स गरज नसतानाही सतत सिग्नल शोधत राहतात. त्यामुळे वापर झाल्यानंतर ही फीचर्स तातडीने बंद करणे आवश्यक आहे.
विशेषतः AMOLED स्क्रीन असलेल्या फोनमध्ये डार्क मोडचा वापर केल्याने स्क्रीनवरील पिक्सेल कमी ऊर्जा वापरतात. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.
बॅटरी दीर्घकाळ टिकावी यासाठी केवळ वापरावरच नाही, तर चार्जिंगच्या पद्धतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, फोन कधीही पूर्णपणे शून्य टक्क्यांपर्यंत संपू देऊ नये किंवा तो शंभर टक्क्यांपर्यंत चार्ज करणेही टाळावे, कारण यामुळे बॅटरीवर ताण येतो.
साधारणपणे बॅटरी २० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान ठेवणे हे तिच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते. तसेच फोन चार्ज करताना नेहमी मूळ चार्जरचाच वापर करावा आणि अति उष्ण ठिकाणी चार्जिंग करणे टाळावे. हे लहान बदल केल्यास तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दिवसातून जास्त वेळ टिकेल. तसेच तिची कार्यक्षमताही वर्षानुवर्षे उत्तम राहील.