अस्थिबोध : खेळाडूंमधील दुखापती
esakal April 28, 2026 09:45 AM

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

खेळ म्हणजे फक्त ताकद आणि कौशल्य नव्हे; तो शरीराच्या मर्यादांचा कस असतो. मैदानावर दिसणारी ऊर्जा, वेग आणि ताकद यामागे पाठीच्या कण्याची मोठी भूमिका असते; पण जिथे वेग, उडी आणि अचानक हालचाली असतात, तिथे कण्यावर ताण येणं अपरिहार्य ठरतं. त्यामुळे खेळाडूंमध्ये स्पाइन इन्जुरीजचा धोका सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असतो. योग्य वेळी न ओळखल्यास आणि काळजी न घेतल्यास ही दुखापत करिअरवरही परिणाम करू शकते.

खेळाडूंमध्ये कण्याला इजा का होते?

  • सततची तीव्र प्रॅक्टिस

  • चुकीची तंत्रे

  • अपुरा वॉर्म-अप

  • स्नायूंचा असमतोल

  • ओव्हरट्रेनिंग

  • योग्य रिकव्हरीचा अभाव

सर्वसाधारण दुखापती

  • मसल स्ट्रेन आणि लिगामेंट इन्जुरी : अचानक हालचाल, वजन उचलणं किंवा झटपट वळणं यामुळे होते. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यास वेदना वाढतात.

  • डिस्क बल्ज किंवा हर्निएशन : क्रिकेट, कुस्ती, वेटलिफ्टिंगमध्ये अधिक दिसते. वेदना पायापर्यंत जाण्याची शक्यता असते.

  • स्पॉन्डायलोलायसिस : तरुण खेळाडूंमध्ये, विशेषतः जिम्नॅस्टिक्स, फुटबॉलमध्ये. कण्याच्या हाडावर ताणामुळे होणारी तडे.

  • फॅसेट जॉइंट पेन : पुनःपुन्हा वाकणं-ताणणं यामुळे कण्याच्या सांध्यांवर ताण येतो.

  • स्ट्रेस फ्रॅक्चर : अतिताणामुळे सूक्ष्म फ्रॅक्चर होतात, विशेषतः लांब पल्ल्याच्या धावपटूंमध्ये.

दुखापतीचे सुरुवातीचे संकेत

  • खेळताना किंवा नंतर पाठदुखी

  • सकाळी stiffness

  • खेळताना आत्मविश्वास कमी होणं

  • हालचालींची रेंज कमी होणं

  • वेदना वाढत जाणं

‘प्रो-लेव्हल’ काळजी

  • अचूक निदान : योग्य तपासणी आणि आवश्यक तेव्हा इमेजिंग.

  • खेळाडूनुसार उपचार : प्रत्येक खेळ, प्रत्येक शरीर वेगळं; उपचारही तसेच असायला हवेत.

  • फिजिओथेरपी आणि कोर ट्रेनिंग : फक्त वेदना कमी करणं नव्हे, तर कणा मजबूत करणं.

  • योग्य विश्रांती आणि रिकव्हरी : दुखापतीनंतर वेळ देणं अत्यावश्यक.

  • रिटर्न-टू-प्ले प्रोटोकॉल : घाई न करता टप्प्याटप्प्याने मैदानात परतणं.

दुखापती टाळण्यासाठी खेळाडूंनी काय करावं?

  • प्रत्येक सत्रापूर्वी वॉर्म-अप

  • नियमित स्ट्रेचिंग

  • कोर मसल्स मजबूत ठेवणं

  • योग्य टेक्निक

  • वेदना असूनही खेळ टाळणं

डॉक्टरांना कधी भेटावे?

वेदना सात-दहा दिवस टिकणं; पायात जाणारी वेदना; कमजोरी; खेळणं अशक्य होणं

खेळाडूचं शरीर हे त्याचं साधन असतं, आणि कणा त्याचा आधारस्तंभ. एका दुखापतीकडे दुर्लक्ष केलं, तर वर्षांची मेहनत धोक्यात येऊ शकते. लक्षात ठेवा, खेळ थांबवणं ही हार नाही, पण कण्याकडे दुर्लक्ष करणं ही मोठी चूक आहे. आज योग्य काळजी घेतली, तर उद्या मैदानात पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहता येतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.