देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचाही आज निकाल; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण देशाचं लक्ष
मुकेश चव्हाण May 04, 2026 09:43 AM

Election Results 2026: देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, पुढील काही तासांत जाहीर होणार आहे. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोतणीला, आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. (Election Results 2026)

ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन,  हिमंता बिस्वा सरमांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या निकालांवर अवलंबून आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय. तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी भाजपची सत्ता यावी, यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. ममता आणि मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बंगालमध्ये, यंदा, मतदानाच्या टक्केवारीने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 92 टक्क्यांपर्यंत मजल मारलीय..त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की पहिल्यांदाच भाजप सरकार याकडे लक्ष लागलं आहे. (assam west bengal tamil nadu kerala puducherry baramati rahuri election result 2026)

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष- (West Bengal Election Result 2026)

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलं आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचीच्या हाती पुन्हा सत्ता येणार की सत्तापालट होणार याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे आजच्या निवडणूक निकालापूर्वी मुंबईत सट्टा बाजार तेजीत आलाय. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सट्टेबाजाराचा कल हाती आलाय. तामिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टेबाजाराचा कौल आला असून मुंबईचा सट्टाबाजारही एक्झिट पोलसारखाच कौल देत आहे.

पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा- (West Bengal Election Result 2026)

बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे.  बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.

बारामती पोटनिवडणुकीचा आज निकाल- (Baramati By Election Result 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे.. दरम्यान बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख 65 हजार 265 मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख 65 हजार 266 हा जादुई आकडा असणार आहे.

राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल- (Rahuri By Election Result 2026)

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचाही आजच निकाल लागणार आहे..राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळकेंसह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान राहुरीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिलेंना जवळपास दीड लाख मतं पडण्याचा अंदाज आहे.

पाच राज्यात कुणाची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज काय? (assam west bengal tamil nadu kerala puducherry election result 2026)

पश्चिम बंगाल: (West Bengal Election Results 2026)

बंगालमध्ये, बहुतेक जनमत चाचण्यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) धक्का बसण्याचा आणि भाजपचा मोठा विजय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तथापि, तृणमूल काँग्रेसने हे अंदाज फेटाळून लावले आहेत आणि ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले आहे की, त्यांचा पक्ष 200 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल.

केरळ: (Kerala Election Results 2026)

केरळमधील बहुतेक एक्झिट पोल्सच्या मूल्यांकनानुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ' (UDF) राज्यात सत्तेवर येण्याच्या स्थितीत आहे. 'Axis My India' चा अंदाज आहे की, यूडीएफला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे; तर 'Manorama C-Voter' नुसार, हा आकडा ९४ जागांपर्यंत पोहोचू शकतो. 140 सदस्यांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 71 आहे; 'एलडीएफ'ला (LDF) 44 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' (NDA) केरळमध्ये मर्यादित प्रभाव असलेला एक पक्ष म्हणून कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

आसाम: (Assam Election Results 2026)

आसाममध्ये, सर्व एक्झिट पोल संस्थांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या भाजप सरकारचे सत्तेवर पुनरागमन होईल, असा अंदाज वर्तवला आहे. 'Axis My India' नुसार, एनडीएला 88 ते 100 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 'Matrize' नुसार, एनडीएला 85 ते 95 जागा, काँग्रेस आघाडीला 25 ते 32 जागा आणि 'इतरांना' (Others) जास्तीत जास्त 12 जागा मिळू शकतात.

तामिळनाडू: (Tamil Nadu Election Results 2026)

तामिळनाडूच्या संदर्भात, बहुतेक एक्झिट पोल्सनी एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी 'डीएमके' (DMK) आघाडीचे सत्तेवर पुनरागमन होईल, असा अंदाज वर्तवला आहे; तथापि, 'थलपती' विजय यांच्या 'तामिझगा वेट्री कझगम' (TVK) या पक्षाकडूनही आश्चर्यकारक कामगिरी केली जाण्याची शक्यता आहे. 'Axis My India' च्या सर्वेक्षणानुसार, विजय यांच्या TVK ला 98 ते 120 जागा मिळू शकतात, तर डीएमके आघाडीला 92 ते 100 जागा आणि 'एआयएडीएमके'च्या (AIADMK) नेतृत्वाखालील एनडीएला केवळ 22 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पुदुच्चेरी: (Puducherry Election Results 2026)

केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये, एक्झिट पोल्स असे सूचित करतात की, एनडीए आपली सत्ता कायम राखण्याची शक्यता आहे. 'पीपल्स पल्स'च्या मते, 30-सदस्यीय विधानसभेत NDA 15 ते 19 जागा मिळवू शकते, ज्यामुळे ती एका भक्कम स्थितीत असेल.

निवडणुकांच्या निकालांचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

West Bengal Election 2026: सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.