स्मार्ट माहिती : 'यूपीआय फ्रॉड'ला लगाम 'ई-रुपी'चा
esakal May 04, 2026 09:45 AM

ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार

आजच्या घडीला डिजिटल व्यवहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ‘यूपीआय’ने व्यवहार सोपे केले असले, तरी सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. अशा वेळी ‘ई-रुपी’ (e-Rupee) हा सुरक्षित पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

ई-रुपी म्हणजे नक्की काय?

ई-रुपी किंवा ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (सीबीडीसी) हे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेले अधिकृत डिजिटल चलन आहे. हे तुमच्या खिशातील कागदी नोटांचे डिजिटल रूप आहे. जसे, आपण पाकिटात नोटा ठेवतो, तसेच ई-रुपी एका डिजिटल वॉलेटमध्ये साठवले जाते.

सुरक्षिततेचा ‘हात’ ई-रुपीकडे का?

खात्याची गोपनीयता : यूपीआय व्यवहार करताना तुमचे बँक खाते स्कॅनरच्या समोर असते. ई-रुपीमध्ये तुम्ही केवळ डिजिटल टोकन्स वापरता, त्यामुळे तुमचे बँक खाते सुरक्षित राहते.

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण : ‘यूपीआय’मध्ये पिन (PIN) चोरीला गेला, तर खाते रिकामे होऊ शकते. मात्र, ई-रुपीमध्ये व्यवहाराच्या मर्यादा आणि आरबीआयची थेट देखरेख असल्याने फसवणूक करणे कठीण आहे.

ऑफलाइन व्यवहारांची सोय : भविष्यात ई-रुपी इंटरनेटशिवायही (Offline) वापरता येईल, ज्यामुळे नेटवर्क नसताना होणाऱ्या तांत्रिक त्रुटी आणि त्यातून होणारी फसवणूक टाळता येईल.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन : ‘यूपीआय’मध्ये अनेकदा केवळ ‘पिन’ माहिती असल्यास फसवणूक होऊ शकते. मात्र, ‘ई-रूपी’मध्ये आरबीआयने अधिक कठोर सुरक्षा नियम लागू केले आहेत. या दुहेरी प्रमाणीकरण पद्धतीत, प्रथम तुमचा वैयक्तिक पिन किंवा पासवर्ड आणि दुसरा तुमच्या मोबाइलवरील ‘ओटीपी’ किंवा बायोमेट्रिक (ठसा किंवा फेस आयडी) अशी दुहेरी तपासणी केली जाते. त्यामुळे तुमचा मोबाईल हरवला किंवा पिन चोरीला गेला, तरी दुसऱ्या स्तरातील सुरक्षिततेमुळे तुमच्या संमतीशिवाय व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत.

निःशुल्क सेवा ः डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी ई-रुपी व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

छपाईखर्च शून्य ः कागदी नोटा छापण्याचा आणि वितरणाचा खर्च वाचत असल्याने, आरबीआयने हे चलन मोफत उपलब्ध करून दिले आहे.

व्यापाऱ्यांसाठी दिलासा ः क्रेडिट कार्डप्रमाणे येथे मर्चंट डिस्काउंट रेट नसल्यामुळे छोट्या दुकानदारांनादेखील ई-रूपी स्वीकारणे परवडते

व्यवहारांची वेगवान पूर्तता ः ‘यूपीआय’ व्यवहार अनेकदा बँक सर्व्हरच्या तांत्रिक समस्यांमुळे अडकतात; परंतु ई रूपी हे प्रत्यक्ष रोख रकमेचे (कॅश) डिजिटल स्वरूप असल्याने यात सेटलमेंटसाठी बँकेवर अवलंबून राहावे लागत नाही. व्यवहार क्षणांत पूर्ण होतात.

‘ई-रूपी’चे भविष्य

आंतरराष्ट्रीय व्यवहार, क्रिप्टोसारखे क्रॉस बॉर्डर पेमेंट्स, कॅशलेस अर्थव्यवस्था, आर्थिक समावेशता, बोगस नोटांना आळा या सर्व बाबतीत ‘ई-रूपी’ची आगेकूच चालूच राहील.

थोडक्यात, कागदी नोटांची विश्वासार्हता आणि डिजिटल पेमेंटची गती याचा सुवर्णमध्य म्हणजे ‘ई-रूपी’ म्हणूनच त्याचे महत्त्व भविष्यात सातत्याने वाढत जाणार, हे निश्चित!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.