सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
जागतिक अस्थिरतेमुळे जगभरातील शेअर बाजारांतही सतत चढ-उतार दिसून येत आहेत. शेअर बाजारात एकप्रकारची अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूक नेमकी कुठे करावी, अशा संभ्रमात सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे.
बचत खात्यावर केवळ तीन ते साडेतीन टक्के इतकाच परतावा मिळू शकतो, पारंपरिक बँक एफडी/पोस्ट/पीपीएफ/आरबीआय बाँड पर्यायात गुंतवणूक केल्यास सात ते साडेसात टक्के परतावा मिळतो. परतावा चांगला असला, तरी गुंतवणुकीत तरलता नसते. शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची तरलता (लिक्विडिटी) महत्त्वाची बाब असते. सध्याच्या अस्थिर शेअर बाजारात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो तो म्हणजे लिक्विड फंड.
हा डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये ट्रेझरी बिले, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोखे (९१ दिवसांपेक्षा कमी मुदतीच्या) यांसारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवणूक केली जाते. या पर्यायांची मॅच्युरिटी खूप कमी असल्यामुळे, व्याजदरातील बदलांचा त्यांच्यावर होणारा परिणाम (इंटरेस्ट रेट रिस्क) खूप मर्यादित असतो, त्यामुळे गुंतवणूक मूल्य स्थिर राहते. पैशांची गरज त्वरित भागविता येते; तसेच ‘करेक्शन’मध्ये गुंतवणुकीसाठी फंड उपलब्ध होऊ शकतात, कारण ‘लिक्विड फंडामध्ये कोणताही लॉक-इन पिरीयड नसतो व यामुळे पैसे काढण्याची विनंती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी (पुढील कामाच्या दिवशी टी +१) पैसे खात्यात जमा होतात. काही फंड तत्काळ ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम देऊ करतात. लिक्विड फंडातून मिळणारा परतावा बचत बँक खात्यापेक्षा जास्त, पाच ते सहा टक्के असतो. बहुतेक लिक्विड फंडांमध्ये, तुम्ही काही दिवसांनंतर (उदा. ७ दिवसांनंतर) पैसे काढले, तर कोणताही एक्झिट लोड लागत नाही, यामुळे आपले नुकसान होत नाही.
लिक्विड फंड कसा वापरावा?
जेव्हा शेअर बाजार खूप अस्थिर असतो, अशा वेळी इक्विटी फंडातून पैसे काढून ते तात्पुरते लिक्विड फंडात ठेवणे फायदेशीर ठरू शकते. जेव्हा बाजार स्थिर होईल, तेव्हा तुम्ही ते पैसे पुन्हा एकरकमी अथवा ‘एसटीपी’द्वारे (Systematic Transfer Plan) गुंतवू शकता.
थोडक्यात, सध्याच्या अस्थिर शेअर बाजारात लिक्विड फंड हे सुरक्षितता, तरलता आणि स्थिर परतावा यांचा समतोल साधतात. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवून बऱ्यापैकी परतवा मिळविण्यासाठी लिक्विड फंड हा निश्चितच चांगला पर्याय आहे.
प्रमुख लिक्विड फंड व त्यांचा मागील एक वर्षाचा परतावा
आदित्य बिर्ला एसएल लिक्विड फंड : ६.५%
टाटा लिक्विड फंड : ६.४९%
एचडीएफसी लिक्विड फंड : ६.३१%
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लिक्विड फंड : ६.२९%
कॅनरा रोबेको लिक्विड फंड : ६.४८%
यूटीआय लिक्विड फंड : ६.३५%
फ्रॅंकलिन इंडिया लिक्विड फंड : ६.५२%