HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध
esakal May 05, 2026 01:45 AM

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मंगळवार (ता. ५) उपलब्ध करून देण्यात येत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइनद्वारे जाहीर केला. राज्य मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पुनर्परीक्षा, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, जून-जुलैमध्ये नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित व विलंब शुल्काने अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच कळविण्यात येतील, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कालावधी -

शुल्क प्रकार : अर्ज भरण्याच्या तारखा : उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यायांनी रक्कम भरायची तारीख : महाविद्यालयांनी पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्याची तारीख

नियमित शुल्क : ५ ते १५ मे : २१ मे पर्यंत : २५ मे पर्यंत

विलंब शुल्कासह : १६ ते २० मे : २१ मे पर्यंत : २५ मे पर्यंत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.