Virar AC Local Protest: विरारमध्ये एसी लोकलविरोधात प्रवाशांचा संताप उसळला; ८:२८ ची सामान्य गाडी बदलल्याने रेल रोको
esakal May 05, 2026 02:45 AM

विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात आज प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली सकाळी ८:२८ ची विरार-चर्चगेट ही सामान्य लोकल अचानक वातानुकूलित (AC) गाडीत रूपांतरित केल्याच्या निषेधार्थ हजारो प्रवाशांनी गाडी रोखून धरली. रेल्वे प्रशासनाच्या या "अनपेक्षित" निर्णयामुळे संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी करत स्थानक परिसर दणाणून सोडला, ज्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.

रेल्वे प्रशासनाने २९ एप्रिल रोजी एक सूचना जारी करून १ मे २०२६ पासून ही गाडी 'एसी' करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सकाळची ८:२८ ची गाडी ही नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीची होती. तीच गाडी बदलल्याने आता इतर गाड्यांवरील भार वाढला आहे. यामुळे प्रवाशांना गाडीत चढ उतार करताना अडचणी येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे, सकाळी ८:३३ वाजता आधीच एक वातानुकूलित लोकल उपलब्ध आहे. केवळ पाच मिनिटांच्या अंतराने दोन 'एसी' गाड्या सोडल्याने सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या पर्यायांची संख्या कमी झाली आहे.एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानकावर जमलेल्या प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.आम्हाला वातानुकूलित गाड्यांना विरोध नाही, पण त्या स्वतंत्रपणे चालवाव्यात. सध्या सुरू असलेल्या सामान्य गाड्यांचे रूपांतर करून गरिबांच्या प्रवासावर गदा आणू नका अशी भूमिका प्रवाशांनी मांडली.दरम्यान प्रशासनाने या आंदोलनाची दाखल घेऊन योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली आहे.

परिस्थिती चिघळल्याचे पाहून रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या अधिकारी त्या ठिकाणी गेल्याने काही काळाने आंदोलनकर्ते प्रवासी शांत झाले.

आंदोलनाचा परिणाम

या आंदोलनामुळे विरार स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. काही गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे विरारसह नालासोपारा, वसई आणि भाईंदर स्थानकांवरही प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.