Illegal Mining Tragedy: टेंभापुरी अवैध उत्खनन दुर्घटना: तीन तरुणांच्या मृत्यूनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
esakal May 05, 2026 02:45 AM

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पात शुक्रवारी (ता. १) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी रविवारी (ता. ३) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

उपजिल्हाधिकारी बंगाळे यांनी तहसीलदार नवनाथ वगवाड, मंडळाधिकारी सचिन भिंगारे, तलाठी दिपाली बागूल, हेड कॉन्स्टेबल विकास जाधव, भीमा शेळके आदी स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह टेंभापुरी मध्यम प्रकल्प परिसर गाठला. त्यांनी दुर्घटनास्थळी तयार झालेल्या खोल खड्ड्याची पाहणी करून उपस्थितांकडून माहिती घेतली तसेच प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शेंदूरवादा परिसरातील लिंबे जळगाव गायरान, टेंभापुरी मध्यम प्रकल्प, जिकठाण गायरान आदी भागांत मोठ्या प्रमाणावर मुरूम व मातीचे अवैध उत्खनन होत असल्याची तक्रार आहे. या उत्खननामुळे परिसरात अनेक महाकाय खड्डे निर्माण झाले असून त्यामध्ये पाणी साचत आहे. या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने निष्पाप तरुणांचे जीव जात असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, तालुक्यात अवैध उत्खननाचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून महसूल प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका घेत असून प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने संबंधितांना अभय मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरू असलेला अवैध कारभार रोखण्यात तालुका प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टेंभापुरी परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटनांची मालिका सुरूच असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी दसऱ्याच्या दिवशी लिंबे जळगाव भागातील तीन मुलांचा अशाच खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याची ही चौकशी लाल फितीत अडकल्याने त्यानंतर आता २६ एप्रिल रोजी एका तरुणाचा बळी गेला. त्या घटनेला काही दिवस ही उलटत नाही तोच १ मे रोजी पुन्हा तीन तरुणांना जलसमाधी मिळाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या भागात सुरू असलेले अवैध उत्खनन बंद करून उत्खननाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली मात्र ठोस निर्णय न झाल्याने उन्हाळ्यातही मुरूम व मातीची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही माफियांनी हा परिसर अक्षरशः खड्डेमय केल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ऐन सुट्टीच्या दिवशी रविवारी झालेल्या पाहणीबाबत तालुका प्रशासनाने गोपनीयता पाळल्याची चर्चा परिसरात सुरू होती. पाहणीनंतर पुढे कोणती कारवाई होणार, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह कायम आहे.

नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्याकडूनच अपेक्षा...

नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या प्रकरणात लक्ष घालून गंगापूर तालुक्यातील अवैध उत्खननाला आळा घालावा, तसेच परिसरात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अवैध उत्खन होऊन कोट्यावधी रुपयाचा बुडालेला महसूल, व कार्यवाहीवर होत असलेली दिरंगाई तसेच आतापर्यंत झालेल्या नऊ जणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

केवळ पंचनाम्याने प्रश्न सुटणार नाही...

अनेकांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने संबंधित खड्ड्यांचे नुसते पंचनाम्यावर पंचनामे केले. मात्र प्रत्यक्षात ठोस कारवाई न झाल्याचे कुठेही दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यापेक्षा धाडसी निर्णय घेऊन अवैध उत्खनन कायमस्वरूपी थांबविण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टेंभापुरी मध्यम प्रकल्पात अवैध उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलाचा मृत्यू झाल्याने जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार संबंधित घटनास्थळाची पाहणी केली असून योग्य ती कार्यवाही संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार आहे.

एकनाथ बंगाळे (उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.