महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे या विवाहासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 100 एकर जागेवर या लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यासाठी इंदोरीकर महराज यांनी प्रचंड पैसा खर्च केला. दरम्यान त्यावरून पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. महाराज आपल्या किर्तनामध्ये नेहमी लग्न साधेपणाने करा, कर्ज काढू नका, जास्त पैसा खर्च करून नका असा सल्ला देतात मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात एवढा खर्च का केला? असा सवालही अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान त्यानंतर आपल्या मुलीच्या लग्नात मनोगत व्यक्त करताना इंदोरीकर महाराज यांनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले इंदोरीकर महाराज?
साखरपुड्याची चर्चा महिनाभर सुरू होती, आता लग्नाची चर्चा वर्षभर सुरू राहील. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने तो खर्च करावा. मी माझ्या मुलीच्या लग्नात पैसा खर्च केला. यातील 90 टक्के पैसा हा मला भाविकांकडून मिळाला आहे, त्यामुळे कोणालाही यावर टीका करण्याचा अधिकार नाहीये. मी एकही पैसा न घेता सरकारी मदत न घेता विद्यालय चालवतो. 13 शिक्षक आहेत. असं यावेळी इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुलीच्या साखरपुड्यावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आपल्या एका किर्तनात इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं होतं, साखरपुड्यावरून टीका झाली, आता मुलीचं लग्न याहीपेक्षा जोरात करणार आणि महाराजांनी आपला शब्द खरा केलं असंही बोललं जात आहे.
साखर पुड्यावरून जोरदार टीका
दरम्यान इंदोरीकर महाराज यांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटात केला होता. इंदोरीकर महाराज यांनी साखर पुड्यावर केलेल्या खर्चावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, त्यावेळी इंदोरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.