13 वर्ष लष्करात देशसेवा केलेला मेजर; 34व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री, दिग्गज अभिनेत्रीसमवेत झळकला अन् ठरला इंडस्ट्रीचा 'टॅलेंटेड अ‍ॅक्टर'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 05, 2026 09:43 AM

Bikramjeet Kanwarpal Life Story: मनोरंजन विश्वातला (Entertainment Industry) असा एक अभिनेता (Actor) ज्यानं तब्बल 13 वर्ष देशसेवा केली, पण नंतर त्याला बॉलिवूडचे (Bollywood) वेध लागले आणि त्यानं इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्यानं इंडस्ट्री पाऊलच ठेवलं नाहीतर, त्यानं प्रेक्षकांची मनंही जिंकली. पडद्यावर एकापेक्षा एक अशा सरस भूमिका साकारून अभिनेत्यानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, त्याचं नाव अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Actor Bikramjeet Kanwarpal). आर्मीत मेजर असलेले बिक्रमजीत केवळ कलाकार नव्हते, तर त्यांच्या रक्तात शौर्याची परंपरा वाहत होती. 

29 ऑगस्ट 1968 रोजी हिमाचल प्रदेशातील सोलन इथे बिक्रमजीत कंवरपाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेजर द्वारका नाथ कंवरपाल हे भारतीय सैन्यातील मान्यवर अधिकारी असून 'कीर्ती चक्र' सन्मानानं गौरविण्यात आलं होतं. लहानपणापासूनच आर्मीच्या छावण्यांमध्ये मोठं झाल्यानं शिस्त म्हणजे, त्यांच्यासाठी फक्त नियम नव्हती, तर त्यांची लाईफस्टाईलच बनलेली .

देशातील प्रतिष्ठित लॉरेन्स स्कूल, सनावर इथे शिक्षण घेत असताना त्यांच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली. मित्र त्यांना प्रेमानं 'बिज' किंवा 'बिजू' या नावानं हाक मारायचे. शालेय नाटकांमध्ये ते नेहमीच आपली छाप सोडत असत. मात्र करिअरची दिशा ठरवताना त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 1989 साली भारतीय सैन्यातील 'हॉडसन्स हॉर्स' (आर्मर्ड कॉर्प्स) मध्ये अधिकारी म्हणून प्रवेश केला.

13 वर्षे देशसेवेसाठी (Indian Army Major Bikramjeet Kanwarpal)

सैन्यातील मेजर कंवरपाल यांचं आयुष्य एखाद्या रॉकस्टारसारखंच रंगतदार होतं. त्यांच्या बॅचलर रूममध्ये मित्रांची सतत मैफिल रंगायची. उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे आणि अत्यंत उत्साही स्वभावाचे बिक्रमजीत हे रस्सीखेच स्पर्धांपासून ते क्लबमधील कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करायचे.

मात्र त्यांचं आयुष्य केवळ मैफिलींपुरते मर्यादित नव्हतं. त्यांनी जगातील अत्यंत कठीण युद्धक्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचिन ग्लेशियर इथेही सेवा बजावलेली. असह्य थंडी आणि सतत मृत्यूच्या सावटात राहण्याच्या अनुभवानं त्यांच्यात अपार धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण झालेला. याच बळावर त्यांनी पुढे मुंबईसारख्या मायानगरीतील संघर्षांनाही निर्धारानं सामोरं गेले. 13 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर, जेव्हा त्यांचं सैनिकी करिअर शिखरावर होतं, तेव्हा वयाच्या 34व्या वर्षी मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पूजा भट्टसोबत पहिली फिल्म (Share Screen With Pooja Bhatt)

त्यांची पहिली भेट 2002 मध्ये मुंबईच्या खार परिसरात प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट हिच्यासोबत झाली आणि त्यानंतर त्यांना त्यांची पहिली फिल्म 'पाप' (2003) मिळाली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2000 साली जेव्हा बॉलिवूड वास्तववादी पात्रांची नितांत गरज होती, तेव्हा दिग्दर्शकांसाठी 'मेजर कंवलपाल' हीच पहिली पसंती ठरली. 'कॉर्पोरेट'मधील वरिष्ठ उपाध्यक्ष असोत, 'डॉन'मधील डॉ. अशोक खिलवाणी, 'रॉकेट सिंग'मधील करारी बॉस इनामदार, किंवा 'मर्डर 2'मधील आयुक्त अहमद खान, जेव्हा जेव्हा पडद्यावर सत्ता, अधिकार किंवा दरारा यांचे मूर्तिमंत रूप साकारण्याची मागणी असं, तेव्हा कंवलपाल यांचं व्यक्तिमत्त्व त्यासाठी अगदी चपखल ठरायचं.

त्यांची डायलॉग फेक, त्यांची देहबोली आणि त्यांचा संयमित, शांत पवित्रा इतका अस्सल वाटायचा की, अनेकदा तर त्यांना अभिनयाची गरजच भासत नाहीये, असं वाटायचं. याशिवाय, 'फ्रोजन' आणि 'द गाझी अटॅक' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी लष्करी सल्लागार म्हणून आलेल्या आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांना रुपेरी पडद्यावर जिवंत केलं.

कोरोनानं कापली आयुष्याची दोरी (Actor Bikramjeet Kanwarpal Death)

दूरचित्रवाणी (Television) आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मच्या विश्वात त्यांनी खरोखरंच आपला ठसा उमटवलेला. '24' मधील 'एजंट प्रधान', 'Adaalat' मधील तीक्ष्ण बुद्धीचा वकील 'रणधावा', तसेच 'Special Ops', 'Bhaukaal' आणि 'Your Honor' सारख्या वेब सिरीजमधील त्यांच्या भूमिकांमुळे ते घराघरात पोहोचले होते. पडद्यावर ते अत्यंत कणखर आणि कठोर वाटत असले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात 'बिजू' हे अत्यंत मृदू स्वभावाचे आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होतं. 

सेटवर असताना ते लष्करी शिस्तीचं काटेकोरपणे पालन करायचे, तरीही, एकदा कॅमेरे बंद झाले की, सेटवरील सहकाऱ्यांशी सर्वाधिक मस्करी आणि गप्पागोष्टी करण्यात तेच आघाडीवर असायचे. ते 'सॉफ्ट रॉक' संगीताचे निस्सीम चाहते होते. एखाद्या मैफिलीत जेव्हा ते हातात गिटार घेऊन जॉन डेन्व्हर यांचं 'Country Roads, Take Me Home' हे गाणं गायचे, तेव्हा उपस्थित असलेले सारेचजण भारावून जायचे. एक उत्कृष्ट नर्तक असण्यासोबतच, सेटवरील प्रत्येकासाठी ते एका 'मोठ्या भावा'सारखे होते, आपल्या लष्करी सेवेतील किस्से सांगून ते अनेकदा सर्वांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह जागवायचे. 2021 मध्ये, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात हैदोस घालत होती, तेव्हा विक्रमजीत कंवरपाल हे देखील या जीवघेण्या व्हायरसचे बळी ठरले. सियाचीनच्या गोठवून टाकणाऱ्या खंदकांमध्ये आणि तिथे सतत डोक्यावर घोंघावणाऱ्या मृत्यूच्या सावलीलाही न डगमगता तोंड देणाऱ्या या सैनिकाला, अखेर मुंबईतील एका रुग्णालयात या कोरोनाविरुद्धची लढाई गमवावी लागली. 1 मे 2021 च्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Film Producer Struggle Life: रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.