'ती' चे क्षितिज : नातं जपण्याचं काम
esakal May 05, 2026 09:45 AM

अॅड. अभिधा निफाडे

सकाळी उठल्यापासून आज घरात जरा गडबडच सुरू होती. मी आईला विचारलं तर म्हणे, ‘‘आज गीता आत्याच्या तीन नंबरच्या नणंदेचं लग्न नाही का, तिकडेच चाललेय.’’ ‘‘अगं आई, पण आत्ता सकाळचे फक्त सात वाजलेत, एवढ्या लवकर जाऊन काय करणार आहेस?’’ मी त्रागा केला तर म्हणाली, ‘‘आत्याला मदत नको का करायला? काय वाटेल त्यांना, एवढ्या जवळ राहून मदतीला आली नाही.’’ असं म्हणून स्कुटीला किक मारून आई गेलीसुद्धा !

आई आत्याकडे गेल्यावर मी आणि बाबाच घरी होतो त्यामुळे वातावरण जरा निवांत होतं.  सोफ्यावर बाबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. एक मे म्हणजे कामगार दिन असल्याने त्या बातम्यांनी वर्तमानपत्रांची पाने भरली होती. त्यावर नजर फिरवताना एक विचार मनात आला, ‘काम’ या शब्दाचा किती मर्यादित अर्थ घेतो आपण. काम म्हटलं की आर्थिक मोबदला मिळणारे, वेळेचे ठरावीक बंधन असलेले आणि औपचारिक रचनेत बसणारे  हा आपला सर्वसाधारण समज आहे.

पण आई सकाळी ज्या ‘कामासाठी’ गेली होती, त्याचं या सगळ्या चौकटीत नेमकं स्थान काय आहे? कारण ‘नातं जपणं’ हे काम  कुठलाही आर्थिक मोबदला न मिळणारं, कामाचे ठराविक तास नसलेलं काम, आई सारखंच अनेक स्त्रिया वर्षानुवर्षे करतायेत. आवडणारी आणि न आवडणारी अशा दोन्ही प्रकारची नाती शाबूत ठेवण्यासाठी त्यांची निगा राखावी लागते आणि त्याचा मुख्य भर स्त्रीवर असतो. नातेसंबंध टिकवणं, सामाजिक जाळं सक्रिय ठेवणं आणि भावनिक बांधिलकी जपणं यासाठी नियोजन, लक्ष आणि सातत्यपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात; हे श्रम मोठ्या प्रमाणावर स्त्रिया कायम पार पाडत असतात. लग्नकार्य असो किंवा इतर प्रसंग कोणालाही वगळलं जाऊ नये, कोणाचा गैरसमज होऊ नये, सगळं सुरळीत पार पडावं यासाठी आवश्यक असलेली बारकाई आणि नियोजन यासाठी स्त्रियांची एक अदृश्य फौजच  कार्यरत असते. आणि एवढंच नाही तर या प्रक्रियेत ‘मागे राहणं’ किंवा ‘तडजोड करणं’ हेही एक महत्त्वाचं अंग ठरतं. वैयक्तिक पसंती, वेळ, किंवा सोय यांना दुय्यम स्थान देत नात्यांना प्राधान्य देण्याचे निर्णय हे नातं टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय असतात. मात्र, या निर्णयांना अनेकदा ‘समजूतदारपणा’ म्हणून गृहीत धरलं जातं आणि त्यामागच्या श्रमांना सोईस्कररीत्या दुर्लक्षिलं जातं.

याच संदर्भात विवाहसंस्थेकडे पाहिलं, तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. लग्नानंतर नात्यांचा व्याप वाढतो, फक्त दोन व्यक्तींमधील नातं राहत नाही, तर दोन कुटुंबं, त्यांच्या सवयी, अपेक्षा आणि संवेदनशीलता यांचं एक जटिल जाळं तयार होतं. या जाळ्याला ताण न येऊ देता, ते सुरळीत ठेवण्याचं काम अनेकदा स्त्रीकडेच असते.

या संदर्भात युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास  ऍट ऑस्टिन  मधील सदर विषयावरचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या संशोधनांमध्ये ‘रिलेशनशिप मेंटेनन्स’ किंवा ‘इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी’ या संकल्पनांकडे पाहताना एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे  नात्यांमध्ये दिसणाऱ्या कृतींपेक्षा अदृश्य भावनिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक प्रमाणात  स्त्रीवर केंद्रित होतात.

सलोखा टिकवण्यासाठी

दोन्ही बाजूंच्या कुटुंबांशी संपर्क राखणं, कुणाची नाराजी ओळखून ती वेळेवर मिटवणं, सण-समारंभांच्या निमित्ताने सगळ्यांना जोडून ठेवणं ही सगळी कामं औपचारिकपणे कुणालाही दिलेली नसतात. पण अपेक्षा मात्र बहुतांशी स्त्रीकडून केली जाते. ‘तिने फोन केला का?’, ‘तिने विचारपूस केली का?’, ‘तिने सगळ्यांना कळवलं का?’ हे सहज कानावर पडणारे प्रश्न त्याचेच द्योतक आहेत. स्त्रीला मानसिकरीत्या थकवणारं हे काम ‘दिसत’ नाही, पण नात्यांमधील सलोखा टिकवण्यासाठी ते पायाभूत ठरतं.

गंमत म्हणजे  नातं सुरळीत चालत असेल, तर या कामाची दखलही घेतली जात नाही मात्र थोडा कुठे तणाव निर्माण झाला, तर मात्र स्त्रीला जबाबदार धरण्यात येतं. म्हणजेच, हे श्रम तर अपेक्षित आहेत पण ते काम म्हणून गणले जात नाहीत. अर्थात, बदलत्या सामाजिक संदर्भात ही भूमिका हळूहळू बदलताना दिसते; अनेक पुरुषही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेताना दिसतात. तरीही, व्यापक पातळीवर पाहिलं, तर नात्यांच्या व्यवस्थापनाची आणि भावनिक जबाबदाऱ्यांची प्रमुख जबाबदारी अजूनही स्त्रीकडेच अधिक प्रमाणात आहे. यामुळेच, कामगार दिनाच्या निमित्ताने ‘काम’ या संकल्पनेचा पुनर्विचार करताना, या अदृश्य श्रमांचाही विचार होणं आवश्यक ठरतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.