Producer RB Choudary Dies In Road Accident: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) शोकसागरात पुरती बुडून गेली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मंगळवारी (5 मे 2026) दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन दिग्गज कलाकारांचं दुर्दैवी निधन झालंय. 5 मे रोजी सकाळी मल्याळम अभिनेते संतोष नायर यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर दुपारपर्यंत आणखी एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता आर. बी. चौधरी (RB Choudary) यांनी आपला जीव गमावला आहे.
तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये 100 हून अधिक सिनेमांची निर्मिती करणारे आर. बी. चौधरी (RB Choudary Death) काळाच्या पडद्याआड गेले आहेत. उदयपूर इथे त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात त्यांची कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. त्यांच्या अपघातग्रस्त गाडीचा फोटो पाहून अपघात किती भीषण होता, हे कळतं.
आर. बी. चौधरी हे साऊथ सिनेसृष्टीतलं मोठं नाव मानलं जात होतं. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आर. बी. चौधरी म्हणजे, तमिळ अभिनेता जीवा याचे वडील. दीर्घकाळ सिनेसृष्टीत कार्यरत राहून त्यांनी 'सुपर गुड फिल्म्स' या बॅनरखाली अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. आर. बी. चौधरी हे साऊथ सुपरस्टार अभिनेता जीवा याचे वडील आहेत.
आर. बी. चौधरी यांनी 1988 साली चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट Pudhu Vasantham होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी त्यांना तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलेलं. त्यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी दिली. दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्या पहिल्या 'पुरियाधा पुधीर' या सिनेमालाही त्यांनी पाठिंबा दिला होता.
आर.बी. चौधरी यांचा शेवटचा सिनेमा 'मरिशन' हा होता, जो जुलै 2025 मध्ये प्रदर्शित झालेला. 'पुष्पा' सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेल्या फहाद फासिल यानं या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. प्रेक्षकांकडून या सिनेमाला अत्यंत उदंड प्रतिसाद मिळालेला. 'लव्ह टुडे', 'जॉली', 'मिस्टर रोमियो' आणि 'एसीपी शिवा' हे आर.बी. चौधरी यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांपैकी आहेत.
आर.बी. चौधरी हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी सिनेसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. त्यांच्या अशा अकाली एग्झिटनं सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 6 मे रोजी त्यांचं पार्थिव चेन्नई इथे नेलं जाईल, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आर.बी. चौधरी यांनी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये 100 हून अधिक सिनेमांची निर्मिती केलीय.