महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची सरकारी नोकरी आणि ग्रॅच्युइटीचे पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी एका पत्नीने स्वतःच्या पतीच्या हत्येची सुपारी दिली. या संपूर्ण कटात तिच्या मैत्रिणीने महत्त्वाची भूमिका बजावली, जिने केवळ कल्पनाच दिली नाही तर संपूर्ण नियोजन करण्यातही मदत केली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ ४६ वर्षीय जिल्हा परिषद शिक्षक रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत होता, मात्र तपासात ही एक नियोजित 'सुपारी किलिंग' असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, या कटाची मुख्य सूत्रधार मृत शिक्षकाची ४२ वर्षीय पत्नी दीपमाला कुलमेथे हीच आहे.
अशी झाली अटक
पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत दीपमाला कुलमेथे आणि तिची मैत्रीण वर्षा परचाके यांना ३ मे रोजी वरोरा येथून अटक केली. तर अन्य दोन आरोपी सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना ४ मे रोजी पहाटे नागपूरमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली कार आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कारमध्ये गळा दाबून केली हत्या
२ मे रोजी सकाळी कर्मवीर शाळेजवळ मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मृताच्या गळ्याला प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट बांधलेला होता. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी रवींद्र तुळशीराम कुलमेथे म्हणून पटली.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दीपमालाची कडक चौकशी केली. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येचे कारण: त्रास आणि पैशांचे आमिष
दीपमालाने सांगितले की, ती पतीकडून होणाऱ्या कथित शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्रस्त होती. नागपूर येथे उपचारादरम्यान तिची भेट वर्षा परचाकेशी झाली, जिने तिला पतीच्या हत्येचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी १ लाख रुपयांची सुपारी देऊन इतर आरोपींना यात सामील करून घेतले.