दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान विनाकारण घराबाहेर पडू नका… अलनीनोचा प्रभाव वाढणार… हवामान विभागाने केलं सतर्क
Tv9 Marathi May 06, 2026 06:45 PM

गेल्या काही दिवसापासून राज्यात भीषण उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. येत्या काळातही हा उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलनीनोच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे प्री-मान्सून पूर्वीच उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्याला तर उष्णतेचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान असलेला तापमानाचा पारा आज थेट 40 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली असून, प्रशासनही सतर्क झालं आहे. जिल्ह्यात अलनीनोचं संकट राहणार असल्याने तापमानाची तीव्रता अधिक वाढणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्षांची निर्मिती करण्यात आली असली तरी वाढत्या उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. दुपारच्या वेळेत नंदुरबार शहरातील रस्ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

यलो अलर्ट जारी

रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढत असून तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आजसाठी हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण पट्ट्यात ‘उष्ण आणि दमट’ हवामानामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, पुढील काही तासांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्री-मान्सून काळातील बदलत्या वातावरणामुळे कधी ढगाळ हवामान तर कधी तीव्र उन्हाचा तडाखा, अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलक्या रंगाचे आणि सूती कपडे परिधान करावेत. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगावला दिलासा

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या तापमानात गेल्या 24 तासात तब्बल दोन ते अडीच अंशांनी घट झाली आहे. 42.6 अंशावर असलेला पारा आज 40.4 अंशावर घसरला आहे. तापमानात घट झाल्याने वातावरणातला उकाडा देखील कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मेच्या सुरुवातीलाच तापमानात घट झाल्याने मे हिटच्या तडाख्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. पुढचे तीन ते चार दिवसात तापमान पुन्हा 44 अंशावर जाणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.