DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास
esakal May 09, 2026 01:45 AM

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Cricket News : दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी पाटा खेळपट्टीवर पाट्या टाकल्या... पथूम निसंकाचे अर्धशतक आणि आशुतोष शर्माची खेळी सोडल्यास DC च्या डावात काही सांगण्यासारखे नाही.. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला.. KL Rahul च्या विकेटनंतर दिल्लीचा डाव गडगडला. KKR ने गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात अफलातून कामगिरी केली आणि DC ला माफक धावसंख्येवर रोखले. दिल्लीने ५१ चेंडू निर्धाव खेळले....

करो वा मरो सामन्यात DC ला अपेक्षित खेळ करता आला नाही. पथूम निसंका व लोकेश राहुल यांनी सलामीला ४९ धावांची भागीदारी केली असली तरी नंतर दिल्लीची गाडी घसरली. लोकेश २३ धावांवर माघारी परतला, परंतु त्याने दिल्लीकडून आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा तीन संघांकडून १००० हून अधिक धावा करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. कार्तिक त्यागीने पाचव्या षटकात लोकेशला माघारी पाठवले.

नितीश राणाला ( ८) कॅमेरून ग्रीनने बाद केले आणि त्यानंतर पुढील १५ धावांत दिल्लीने तीन फलंदाज गमावले. KKR च्या अनुकूल रॉयने एकाच षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. २९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांस ५० धावांची खेळी करणाऱ्या निसंकाला त्याने चतुराईने यष्टिचीत होण्यास भाग पाडले. त्यानंतर ट्रिस्तन स्तब्सचा ( २) त्रिफळा उडवला. त्याआधी सुनील नरीनने समीर रिझवीला ( ३) बाद केले होते. दिल्लीचा निम्मा संघ ८९ धावांत तंबूत परतला होता.

दिल्लीला ७ ते १५ षटकांत ४ बाद ४३ धावा करता आल्या आणि ही आयपीएलच्या या पर्वातील मधल्या षटकांमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी KKR ने राजस्थान रॉयस्लविरुद्धच्या सामन्यात या षटकांत ३ बाद ४६ धावा केल्या होत्या. अक्षर पटेल व आशुतोष शर्मा हे मैदानावर उभे होते, परंतु त्यांना KKR च्या गोलंदाजांनी जखडून ठेवले होते.

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

शेवटच्या तीन षटकांत आशुतोषने हात मोकळे करण्यास सुरुवात केली. या दोघांनी संघाला ५ बाद ८९ वरून १२८ धावांपर्यंत पोहोचवले. अक्षर २२ चेंडूंत ११ धावांवर झेलबाद झाला. अनुकूलने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. २०व्या षटकात आशुतोष बाद झाला. त्याने २८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेने अविश्वसनीय झेल टिपला. दिल्लीला ८ बाद १४२ धावांवर समाधान मानावे लागले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.