थलपती विजयला मोठा धक्का, दोन पक्षांनी दाखवला ठेंगा… शपथविधीबाबत सस्पेन्स कायम; तामिळनाडूत घडामोडींना वेग
Tv9 Marathi May 09, 2026 02:45 AM

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सरकार स्थापनेबाबतचा सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. समोर आलेल्या माहितीनुसास थलपती विजय हे शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते, मात्र अद्याप याबाबत संभ्रम काय आहे. राज्यपालांना अजूनही दोन पक्षांची समर्थनपत्रे मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप शपथविधीची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

दोन पक्षांच्या आमदारांचे पत्र मिळाले नाही

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, VCK आणि IUML या पक्षांचे समर्थनपत्र (आमदारांच्या स्वाक्षरीसह) राज्यपालांकडे अद्याप पोहोचलेले नाही. VCK ने पाठिंबा देण्यासाठी विजय यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे माहिती समोर आली आहे, तर IUML पक्षाने आपण M. K. Stalin यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विजय यांच्या शपथविधीबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. काही तासांपूर्वी विजय यांनी राज्यपालांना 116 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर केले होते. तसेच उर्वरित आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची पत्रे लवकरच मिळतील, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र ही समर्थन पत्रे अद्याप राज्यपालापर्यंत पोहोचलेली नाहीत.

विजय यांना या पक्षांचे समर्थन

विजय यांनी राज्यपालांकडे दिलेल्या या समर्थनपत्रांमध्ये TVK चे 107, काँग्रेसचे 5 आणि CPI-CPM चे 4 अशा 116 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवडणुकीत TVK ला 108 जागा मिळाल्या होत्या. मात्र विजय यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली असल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची आमदारसंख्या 107 मानली जात आहे. त्यामुळे अजूनही विजय यांनी काही आमदारांची गरज आहे.

TVK पक्षाची दमदार कामगिरी

चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्या प्रवेशामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवी लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या TVK पक्षाला युवक, महिला आणि सामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरला आहे. विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांवर जनतेला आता नव्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवूनही पक्षाने दमदार कामगिरी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.