Tamilnadu Govenrment Formation Live: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी, विजय सरकारचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तीन दिवसांच्या विलंबानंतर, निवडणुकीत दोन जागा जिंकलेल्या व्हीसीकेने (VCK) विजयच्या टीव्हीके (TVK) पक्षाला आपले पाठिंबा पत्र सादर केले आहे. व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीके नेते अधव अर्जुन यांना पाठिंबा पत्र सुपूर्द केल्याचा एक फोटोही समोर आला. यासह, टीव्हीकेने सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा आकडा गाठला आहे.
व्हीसीकेच्या पाठोपाठ, इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) देखील तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यापूर्वी, आययूएमएलने टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याच्या वृत्तांचे खंडन केले होते. दरम्यान, घोडेबाजाराच्या भीतीमुळे काँग्रेसने आपले पाच आमदार हैदराबादला पाठवले आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, मेलूरचे आमदार पी. विश्वनाथन हे आमदारांच्या या गटाचे नेतृत्व करत आहेत. सूत्रांनी असेही संकेत दिले आहेत की, टीव्हीकेचे सरकार स्थापन झाल्यास पी. विश्वनाथन यांना मंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या असून, यापैकी दोन जागा विजयने जिंकल्या आहेत. पक्षाला काँग्रेसच्या पाच आमदारांकडून आणि सीपीआय व सीपीआय(एम)च्या प्रत्येकी दोन आमदारांकडून पाठिंब्याची पत्रे आधीच मिळाली होती. व्हीसीकेच्या पाठिंब्याने विजय यांच्याकडे 119 आमदार असतील. हा बहुमताच्या आकड्यापेक्षा एकने जास्त आहे. टीव्हीकेला व्हीसीकेचा पाठिंबा असल्याच्या चर्चा गेल्या तीन दिवसांपासून सुरू होती. व्हीसीकेचे प्रमुख थिरुमावलवन यांनी शुक्रवारी सकाळी जाहीरपणे सांगितले की, त्यांचा पक्ष टीव्हीकेला पाठिंबा देईल. तथापि, रात्री उशिरापर्यंत पाठिंब्याचे औपचारिक पत्र सादर केले गेले नाही. यामुळे आज 9 मे रोजी होणारा विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला.
अभिनेता विजय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला, परंतु त्यांच्याकडे केवळ 116 आमदारांची पाठिंब्याची पत्रे होती. यापूर्वी, विजय यांनी 6 आणि 7 मे रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. तथापि, 118 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या