RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर
esakal May 10, 2026 01:45 AM

Rajasthan Royals vs Gujarat Titans Marathi Updates: गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील शनिवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर पहिल्या डावात वर्चस्व गाजवले. शुभमन गिल ( Shubman Gill) व साई सुदर्शन यांनी संघाला ११८ धावांची सलामी दिल्यानंतर RR च्या गोलंदाजांना पुनरागमन करणे अशक्यच झाले होते. संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरच आज अपयशी ठरला आणि त्यामुळे अन्य सहकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले दिसले. शुभमनने ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. साई ३६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर झेलबाद झाला.

जोफ्रा आर्चरने पहिले षटक पूर्ण करण्यासाठी ११ चेंडू टाकून GTला शुभंसकेत दिले. त्यानंतर शुभमन गिल व साई सुदर्शन या जोडीने RR च्या गोलंदाजांनी धुलाई केली. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ८२ धावा चोपून त्यांनी सामन्यावरील पकड मजबूत केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना आयपीएलमध्ये सलामवीर जोडी म्हणून सहावी शतकी भागीदारी केली. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ही संयुक्तपणे सर्वाधिक शतकी भागीदारी ठरली. डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन आणि अभिषेक शर्म व ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीला प्रत्येकी ६ वेळा शतकी भागीदारी केली.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

आयपीएलमधील एकूण कोणत्याही विकेटसाठी साई व गिल यांचीही ९वी शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी विराट कोहली व ख्रिस गेल ( RCB) यांच्याशी बरोबरी केली. या विक्रमात १० शतकी भागीदारीसह विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स ( RCB) हे अव्वल क्रमांकावर आहेत. ११ व्या षटकात यश राज पुनियाने RR ला पहिले यश मिळवून दिले. साई ३६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर झेलबाद झाला. गुजरातने ११८ धावांवर पहिली विकेट गमावली आणि ही राजस्थानविरुद्धची त्यांची सर्वोत्तम भागीदारी ठरली.

यशने त्यानंतर शुभमनलाही माघारी पाठवले होते, पंरतु रोमव्हम पॉवेलने सोपा झेल टाकला. जॉस बटलरला १३ धावांवर रवींद्र जडेजाने माघारी पाठवले. GT ने पहिल्या सहा षटकांत ८२ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर ७ ते १५ षटकांत त्यांनी २ फलंदाज गमावूनही ८४ धावा कुटल्या. शुभमन शतकाच्या जवळ जाऊन पुन्हा माघारी परतला. १७व्या षटकात त्याला ब्रिजेश शर्माने तुषार देशपांडेच्या हाती झेलबाद केले. शुभमनने ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.

जेसन होल्डर ( ७) ब्रिजेशच्या चेंडूवर झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवातिया यांनी शेवटच्या षटकांत मोर्चा सांभाळताना गुजरातला ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. राहुलने ४ चेंडूंत १४ धावा केल्या, तर वॉशिने २० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा केल्या. राजस्थानविरुद्ध या पर्वात सर्वाधिक ७ वेळा प्रतिस्पर्ध्यांनी २०० हून अधिक धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.