आयपीएल 2026 स्पर्धेत 52 सामन्यांचा खेळ संपला आहे. 52व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी धुव्वा उडवला आणि टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. पण अजूनही कोणताच संघ प्लेऑफमधील जागा पक्की करू शकलेला नाही. तसेच दहाही संघाना टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयानंतर 14 गुण खात्यात जमा झाले असून पाचव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर राजस्थान रॉयल्सची घसरण झाली असून चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेला आहे. यामुळे प्लेऑफची रंगत आणखी वाढणार असं दिसत आहे. गुजरात टायटन्सचे आता 3 सामने शिल्लक असून एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील जागा पक्की होईल. तर राजस्थान रॉयल्सला आला तीन पैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे.
आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाने 11 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून 14 गुण आणि +0.737 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. दुसऱ्या स्थानावर 14 गुण आणि +0.228 नेट रनरेटसह गुजरात टायटन्सन पोहोचला आहे. पंजाब किंग्स संघ 13 गुण आणि +0.571 नेट रनरेटसही तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 12 गुण आणि +1.234 नेट रनरेटसह चौथं स्थान आहे. राजस्थान रॉयल्सच्या खात्यात 12 गुण असून नेट रनरेट पराभवामुळे कमी झाला आहे. त्यामुळे पाचव्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सने 10 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे खात्यात 10 गुण आणि +0.151 नेट रनरेट असून सहाव्या स्थानावर आहे. अजून चार सामने खेळायचे असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. आतापर्यंत 10 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामना ड्रॉ झाल्याने एक गुण मिळाला आहे. त्यामुळे 9 गुण आणि -0.169 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. आता उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल.
दिल्ली कॅपिटल्सचे 8 गुण आणि नेट रनरेट हा -1.154 आहे. मुंबई इंडियन्सचे 6 गुण आणि नेट रनरेट हा -0.649 आहे आणि लखनौ सुपर जायंट्सचे 6 गुण आणि -0.649 नेट रनरेट आहे. या तिन्ही संघांची एक सारखी स्थिती आहे. या तिन्ही संघांचं 16 गुणांचं गणित काही सुटणार नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होतील. त्यामुळे आता टॉपच्या संघाच्या स्थितीवर या संघांचं गणित अवलंबून आहे.