‘तमिळगा वेत्री कझगम’चे (टीव्हीके) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवारी) निवडणुकीतील दमदार विजयानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, विजय यांचे आईवडील, अभिनेत्री त्रिशा कृष्णन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उपस्थित होते. शपथविधी घेण्यापूर्वी विजय यांनी मंचावर आपल्या अंदाजात भाषण देण्यास सुरुवात केली. यावेळी संपूर्ण स्टेडियमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांच्या नावाचा जयघोष होऊ लागला. पण त्याचवेळी राज्यपालांनी विजय यांना थांबवलं आणि शपथ घेण्यास सांगितलं.
नेमकं काय घडलं?शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वीविजययांनी राज्यपाल आर्लेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी शपथ घेणाऱ्या इतर आमदारांचीही ओळख राज्यपालांशी करून दिली. त्यानंतर राज्यपालांसोबत विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. थलपती विजय यांच्या हातात एक कागद देण्यात आला, ज्यावर गोपनियतेची शपथ लिहिलेली होती. राज्यपालांनी शपथ देण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, “नान (मी)..” त्यानंतर विजय यांनी आपलं नाव सांगितलं आणि तमिळमध्ये भाषण देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हा तमिळनाडूचा विजय आहे, असं म्हणत ते यावेळी भावूक झाले. अत्यंत ऊर्जेनं ते उपस्थितांना संबोधित करत होते, तितक्यातच राज्यपालांनी विजय यांना रोखलं. त्यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ घेण्यास सांगितलं आणि त्यानुसार पुढील कार्यक्रम पार पडला.
विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन 120 सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं होतं. राज्यपालांची तीन दिवसांत तीन वेळा भेट घेऊनही विजय यांना बहुमताचा आकडा जुळवता आला नव्हता. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. कमल हासन आणि प्रकाश राज यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली होती. विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित न करणं हा तमिळनाडूच्या जनतेच्या जनादेशाचा अनादर आहे, अशा शब्दांत कमल हासन यांनी टीका केली होती. अखेर काँग्रेस, सीपीआय, सीपीआय-एम, विदुथलाई चिरुथैगल कची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययुएमएल) यांच्या पाठिंब्याने विजय यांनी बहुमत सिद्ध केलं.