Dhurandhar 2 Box Office Collection worldwide : रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर 2 : द रिव्हेंज' (Dhurandhar 2) स्पाय-थ्रिलर चित्रपट रिलीज होऊन तब्बल 52 दिवस उलटले असले तरी बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार घोडदौड कायम आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठी वाहवा मिळवली. काही देशांमध्ये बंदी असूनही प्रेक्षकांनी पायरेटेड अॅप्सच्या माध्यमातून चित्रपट पाहिल्याचंही समोर आलं. दिग्दर्शक आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली घडलेल्या या चित्रपटातील कलाकार, कथा, अॅक्शन आणि कास्टिंगची प्रचंड चर्चा झाली. विशेष म्हणजे नवीन रिलीज झालेल्या भूत बंगला, एक दिन आणि कृष्णावतारम यांसारख्या चित्रपटांच्या रिलीजनंतरही ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. (Box Office Collection)
धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे 7 आठवडे पूर्ण केले असून 52 व्या दिवशीही विकेंडचा फायदा घेत दमदार कमाई केली आहे. अनेक नवीन चित्रपटांच्या स्पर्धेनंतरही ‘धुरंधर 2’ने जगभरात तब्बल 1795 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
देशांतर्गत कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगनंतर पेड प्रिव्ह्यूमध्ये 43 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पहिल्याच दिवशी 102.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवत चित्रपटाने विक्रमी सुरुवात केली. 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर सातव्या आठवड्याचा शेवट 5.58 कोटी रुपयांच्या कमाईसह झाला. आता 52 व्या दिवसाची कमाईही समोर आली असून चित्रपटाने एका दिवसात 90 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील एकूण कमाई 1141.99 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 1366.79 कोटी रुपये इतकं झालं आहे.
विशेष म्हणजे, ‘धुरंधर 2’ हा एका भाषेत 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या को-प्रोड्यूसर ज्योती देशपांडे यांनी नुकतंच ‘धुरंधर 3’बाबत संकेत दिल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलं आहे. ‘धुरंधर 2’ दंगलचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडू शकेल का? आमिर खान यांच्या ‘दंगल’ने जगभरात 2070 कोटी रुपयांची कमाई केली होती. सध्या मोठा प्रतिस्पर्धी चित्रपट नसल्याने ‘धुरंधर 2’ची बॉक्स ऑफिसवरील पकड कायम आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडला जाणार का, याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे.