पंजाब किंग्सचा पुन्हा बट्ट्याबोळ; श्रेयस अय्यरने थेट या खेळाडूंनाच धरलं पराभवासाठी जबाबदार
Marathi May 12, 2026 11:25 AM

श्रेयस अय्यर विधान पीबीकेएस वि डीसी आयपीएल २०२६ : आयपीएल 2026 मध्ये दमदार सुरुवात करणारी पंजाब किंग्सची गाडी आता रुळावरून घसरताना दिसत आहे. संघाला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सलग चार पराभवानंतरही पंजाब 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन विकेट्सने झालेल्या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केली.

211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 33 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, कर्णधार अक्षर पटेल (30 चेंडूत 56 धावा, 8 चौकार, 2 षटकार) आणि डेव्हिड मिलर (28 चेंडूत 51 धावा, 3 चौकार, 4 षटकार) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे सामना फिरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची महत्त्वाची भागीदारी करत दिल्लीला 19 षटकांत 7 विकेट्स गमावून 216 धावांपर्यंत पोहोचवले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला.

याआधी पंजाबने श्रेयस अय्यरच्या नाबाद 59 धावांच्या खेळीच्या जोरावर 5 बाद 210 धावा उभारल्या होत्या. अय्यरने 36 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले, तर प्रियांश आर्यने 33 चेंडूत 56 धावांची तुफानी खेळी करत 6 षटकार आणि 2 चौकार लगावले. सामन्यानंतर अय्यर म्हणाला, “गोष्टी फिरवून सांगण्याची गरज नाही. पुन्हा एकदा आमचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी निराशाजनक ठरली.” मात्र, त्याने संघाने अपेक्षेपेक्षा जास्त धावा केल्याचंही मान्य केलं.

तो पुढे म्हणाला, “या विकेटवर आम्ही किमान 30 धावा जास्त केल्या होत्या. चेंडू सीम होत होता आणि उसळीही अनियमित होती.” फिरकीपटू युझवेंद्र चहलला गोलंदाजी न दिल्याबद्दल विचारलं असता अय्यर म्हणाला, “आम्ही त्याबद्दल विचार केला होता. पण चेंडू सीम होत असल्याने जर आम्ही योग्य लाईन आणि लेंथ टाकली असती, तर विकेट्स मिळाल्या असत्या. मात्र आम्ही तसं करू शकलो नाही. माझ्या मते हार्ड लेंथ किंवा शॉर्ट ऑफ हार्ड लेंथ हीच सर्वोत्तम गोलंदाजी असते.”

हे ही वाचा –

IPL Playoff Qualification Scenarios : दिल्लीच्या विजयाने दिग्गज संघांची झोप उडाली, कुणाला 1 तर कुणाला 2 विजय हवेत; IPL प्लेऑफच्या शर्यतीतून कोण होणार ‘IN’ अन् कोण ‘OUT’?, जाणून घ्या गणित

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.