भारतात एका बाजूला आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. प्लेऑफमधील 4 जागांसाठी 8 संघात चढाओढ आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. अनेक संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. दक्षिण आफ्रिकेनेही या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
लॉरा वॉल्डवॉर्ट दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. मात्र एका खेळाडूच्या नावामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप संघात 2023 साली निवृत्ती घेतलेल्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने देशाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
शबनीम इस्माईलने देशासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. शबनीमने 2023 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. शबनीमचा 2023 मधील टी 20i वर्ल्ड कप फायनल हा शेवटचा सामना ठरला होता. दक्षिण आफ्रिकेचं तेव्हा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. ऑस्ट्रेलिया तेव्हा वर्ल्ड चॅम्पियन ठरली होती. मात्र आता 3 वर्षांनंतर वयाच्या 37 व्या वर्षी कमबॅकचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शबनीम या स्पर्धेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंडकडे आहे.
शबनीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. शबनीमच्या कमबॅकमुळे दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिगंची धार वाढेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे. शबनीम दक्षिण आफ्रिकेची टी 20i मधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. शबनीमने 113 सामन्यांत 123 विकेट्स मिळवल्या आहेत.
आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका टीम : लॉरा वॉल्डवॉर्ट (कर्णधार), ताझनिम ब्रिट्स, शबनीम इस्माइल, सिनालो जाफ्ता, मारिजान काप, सुने लुसे, अयाबोंगा खाका, कराबो मेसो, नॉनकुलूलेको लाबा, कायला रेनके, तुमी सेखुखुने, क्लो ट्रायन, एनेरी डर्कसेन, डेन वॅन निकर्क आणि नाडीन डी क्लर्क.