वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धा सुरू असून टॉप दोन स्थानावर जागा मिळवण्यासाठी चुरस सुरू आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 आणि 2021-23 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर 2023-2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवता आली नाही. असं असताना चौथ्या पर्वात तरी टीम इंडिया कसोटी चॅम्पियन्शिपच्या अंतिम फेरीत धडक मारेल आणि जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वास आहे. पण दक्षिण अफ्रिकेने घरच्या मैदानावर क्लिन स्वीप दिल्याने अंतिम फेरीच्या आशा मावळल्या आहेत. असं असताना बांगलादेशने पाकिस्तानला दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाची धूळ चारली. यामुळे भारताला थेट फायदा झाला आहे. भारतीय संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेला आहे. तर पाकिस्तानची पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
बांग्लादेश पाकिस्तान सामना होण्यापूर्वी 9 पैकी 4 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाल्याने 48.15 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानी होती. तर पाकिस्तानचा संघ 2 सामने खेळला होता. एका सामन्यात विजय आणि एक सामना गमावला होता. त्यामुळे 50 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर होता. पण बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करताच हे चित्र बदललं आहे. भारत पाचव्या स्थानावर आहे. तर बांग्लादेश तीन सामने खेळत 1 सामना जिंकून, 1 सामना गमवून आणि 1 सामना बरोबरीत सोडवून सहाव्या स्थानावर आला आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 44.44 इतक आहे. तर पाकिस्तानचा संघ 33.33 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानी घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी 7 जिंकले आणि एक सामना गमावला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 87.50 आहे आणि पहिलं स्थान गाठलं आहे. न्यूझीलंडने 3 पैकी 2 सामने जिंकले आणि एक ड्रॉ केला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 77.78 असून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ 4 पैकी 3 सामन्यात विजय आणि 1 सामना गमवून 75 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या, श्रीलंका दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवून 66.67 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा संघ आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर 6 पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 31.67 आहे. तर वेस्ट इंडिजने 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. एक सामना ड्रॉ करण्यात यश आलं आहे. पण विजयी टक्केवारी ही 4.17 असून सर्वात शेवटी आहे.