तुमच्या घरात साप लपलाय की नाही हे कसं ओळखायचं? परदेशातील सर्पतज्ज्ञांनी सांगितली सर्वात सोपी ट्रीक
Tv9 Marathi May 13, 2026 01:45 AM

उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतुंमध्ये सापांचं आपल्या बिळाबाहेर पडण्याचं प्रमाणत मोठ्या प्रमाणात वाढतं. आपलं घर हे खूप सुरक्षित आहे, असं आपल्याला वाटतं. मात्र तरी देखील अनेकदा आपली नजर चुकून सापांसारखे काही प्राणी घरात घुसू शकतात. बिळातून बाहेर पडलेला साप हा अंधाऱ्या आणि थंड जागेच्या शोधात असतो, जर अशी जागा तुमच्या घरात असेल तर साप तुमच्याही घरात घुसू शकतो. साप केवळ घरातच नाही तर बाग, वेअर हाऊस, गेस्ट हाऊस असा कुठेही घुसू शकतो. एखाद्या ठिकाणी साप जर लपून बसला असेल तर आपल्याला तिथे काही संकेत मिळतात. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अनर्थ देखील घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा संकेतांकडे दुर्लक्ष होता कामा नये. एखाद्या ठिकाणी साप आहे? हे कसं ओळखायचं तर याबाबत इंटरनॅशनल वाईडलाईफ तज्ज्ञांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

तुमच्या घरात किंवा परिसरात साप आहे, याचा सर्वात मोठा पुरावा असतो तो म्हणजे सापाची कातीन. जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठेही सापाची कातीन आढळून आली तर सावध व्हा कारण तेवढ्या परिसरात कुठे न कुठे साप असण्याची मोठी शक्यता असते. सापांच्या अंगावर एका विशिष्ट कालावधीनंतर एक ठरावीक थर जमा होत असतो, हा थर दिसायला काहीसा पांढरा आणि जाळीदार असतो, या थरामुळे साप थोडा सुस्त बनतो, मात्र त्यानंतर तो त्या थराचा त्याग करतो, त्यालाच कातीन असं म्हटलं जातं.

जर समजा तुमच्या घरात कुठे साप असला तर तुम्हाला तुम्ही जे पाळीव प्राणी पाळले आहेत, त्याचं वर्तन नेहमीपेक्षा थोडं वेगळं वाटतं. जसं की तुम्ही जर गाय किंवा म्हैस पाळली असेल तर ती सारखी हांबरते. किंवा तुम्ही जर एखादं कुत्रं किंवा मांजर पाळली असेल आणि हे प्राणी जर सातत्याने एकाच दिशेला तोंड करून भुंकत असतील किंवा म्याव म्याव करत असतील तुमच्या घरात एखाद्या ठिकाणी अंधारा भाग असतो सारखे तिकडेच जात असतील तर वेळीच सावध व्हा. अशा ठिकाणी साप असण्याची शक्यता 80 ते 90 टक्के एवढी असतो.

पक्ष्यांचा कलकलाट – जर तुमच्या घराच्या परिसरात कुठेही साप निघाला असेल तर अशावेळी अचानक पक्ष्यांचा कलकलाट वाढतो, अशावेळी तिथे साप असण्याची शक्यता वाढते, असं तज्ज्ञ सांगतात, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.