आडूळ - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर (ता. पैठण) शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाचा मागील टायर फुटल्याने हायवा पलटी झाला. त्यानंतर रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे घसरून एका कारने समोरील दुसऱ्या कारला पाठीमागून धडक दिली. या दोन्ही अपघातांमध्ये चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Triple Accident
पाचोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोडकडून वाळू वाहतूक करणारा हायवा (क्र. एमएच २३ बीएक्स ३४७३) भरधाव वेगाने धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. रजापूर येथील उड्डाण पुलाजवळ आल्यानंतर हायवाचा मागील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हायवा रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात हायवामधील दोघेजण बालंबाल बचावले.
हायवा पलटी झाल्यानंतर त्यामधील वाळू मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरली. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, काही वेळाने पाचोडकडून येणारी कार (क्र. एमएच १३ ईके ५६९७) रस्त्यावर साचलेल्या वाळूमुळे घसरली. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून जात असलेल्या दुसऱ्या कार क्रमांक एम एच २३ बीसी ९०९ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास रणजितसिंग दुल्हत करीत आहेत.
हॉटेलच्या सीसीटीव्हीत घटना कैद
रजापूर येथील अपघाताच्या ठिकाणाजवळ असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही अपघातांची संपूर्ण घटना कैद झाली आहे. टायर फुटल्यानंतर भरधाव हायवा थेट हॉटेलच्या दिशेने सरकल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने हायवा हॉटेलमध्ये न घुसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.