Shendurwada News : जप्त केलेला जेसीबी रात्रीच गायब; महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह?
esakal May 13, 2026 02:45 AM

शेंदूरवादा - दैनिक सकाळच्या 'कुठेय तलाठी?' या वृत्तमालिकेतून गंगापूर तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर महसूल प्रशासनाने पिंपळवाडी शिवारातील शिवना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सोमवारी (ता. ११) दुपारी धडक कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला एक जेसीबी रात्रीच गायब झाल्याने महसूल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी मनीषा कोतकर यांनी आपल्या पथकासह सोमवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास पिंपळवाडी शिवारातील शिवना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर छापा टाकला. या कारवाईत दोन जेसीबी आणि दोन हायवा वाहन जप्त करण्यात आले. त्यापैकी एक जेसीबी व दोन्ही हायवा तहसील कार्यालयात आणून तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या समोर हजर करण्यात आले.

दरम्यान, दुसरा जेसीबी घटनास्थळीच बंद पडल्याने तो तहसील कार्यालयात आणण्यास अडचणी असल्याचे कारण पुढे करत संबंधित अधिकाऱ्यांनी तो जेसीबी नदीपात्रातच ठेवून पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला. मात्र, वाळूपात्रासारख्या संवेदनशील ठिकाणी केवळ पोलीस पाटलांच्या भरोशावर जप्त वाहन सोडणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव असूनही महसूल प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचा आरोप होत आहे.

स्थानिकांच्या मते, संबंधित जेसीबी महसूल विभागाने स्वतःच्या ताब्यात घेणे किंवा त्या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने वाळू माफियांनी संधी साधत सोमवारी रात्रीच तो जेसीबी तेथून गायब केला. जर माफिया जेसीबी घेऊन जाऊ शकतात, तर महसूल विभागानेच तो जेसीबी सुरक्षित स्थळी का हलवला नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी धाडसाने कारवाई केली असली, तरी वरिष्ठांनी जप्त वाहनाची योग्य सुरक्षा न राखल्याने संपूर्ण कारवाईवर पाणी फिरल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या नियोजन, समन्वय आणि कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, जप्त वाहन गायब होण्यामागे नेमके जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच महसूल विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी संबंध आहेत काय, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (ता. १२) रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल घटनेला २४ ते ३० तास उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय अधिक गडद होत आहे.याविषयी तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.