मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन करून दोन दिवस उलटत नाहीत, तोच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या शिस्तीला हरताळ फासला आहे. मुंबईतील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी साटम यांनी २५ गाड्यांचा अवाढव्य ताफा वापरल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे.
‘जनतेला त्यागाचे सल्ले आणि स्वतःला मात्र शाही थाट,’ अशा शब्दांत विरोधकांनी साटम यांच्या भूमिकेचा पंचनामा केला आहे. अमित साटम यांनी मंगळवारी मुंबई उपनगरांमध्ये नालेसफाईचा आढावा घेतला. या दौऱ्याचे स्वरूप एखाद्या राजकीय मिरवणुकीसारखे होते. साटम यांच्या स्वतःच्या वाहनांसह या ताफ्यात आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची लांबलचक रांग होती.
Mumbai Local: धावती लोकल पकडताना पडला, प्लॅटफॉर्ममध्ये तरूण अडकला अन्...; धक्कादायक व्हिडिओ व्हायरलएका बाजूला सामान्य नागरिक महागाई आणि इंधन दरवाढीने होरपळत असताना सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नालेसफाईसारख्या कामासाठी अशा प्रकारे इंधनाची उधळपट्टी करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विरोधकांचे टीकास्त्र
या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमित साटम यांच्यावर हल्ला केला. ‘पंतप्रधानांचा सल्ला फक्त सामान्य माणसानेच पाळायचा का, साटम यांना इंधन बचतीचा विसर पडला आहे की ते सत्तेच्या नशेत आहेत,’ असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला, तर रोहित पवार यांनी या ताफ्यावर खोचक टिप्पणी करत, ‘बहुधा यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात,’ असा टोला लगावला.
दरम्यान, टीकेनंतर अमित साटम यांनी ‘आमचा दौरा वसुलीसाठी नाही तर सुरक्षेसाठी आहे,’ असा दावा केला असला, तरी २५ गाड्यांच्या ताफ्याचे समर्थन करताना त्यांची दमछाक होताना दिसली.
Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!