मंत्र्यांचा ताफा दिसला रे दिसला की रोखूच… वसंत मोरे आणि जितेंद्र आव्हाड घोड्यावर; पुणे आणि ठाण्यात जोरदार निदर्शने
Tv9 Marathi May 13, 2026 01:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, इंधन वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच सोनं खरेदी आणि परदेशी प्रवास टाळण्याचेही आवाहन केले आहे. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला विरोधकांकडून विरोध होताना पहायला मिळत आहे. मोदींच्या आवाहनाविरोधात अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादी शरद जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वसंत मोरेंचे पुण्यात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पुण्यात वसंत मोरे यांनी घोड्यावर बसून आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी बोलताना मोरे म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला आहे त्याची सुरुवात प्रशासनातील अधिकारी आणि सरकारी मंत्र्यांनी सुरूवात केली पाहिजे. सरकारी गाड्यांचा ताफा कमी करा म्हणजे इंधन बचत होईल.’

मंत्र्यांचा ताफा दिसल्यास…

पुढे बोलताना मोरे यांनी म्हटलं की, ‘स्वत:च्या चुका आणि अपयश झाकण्याचं सरकारचं काम सुरु आहे. सगळ्या मंत्र्यांचे ताफे बंद केले पाहिजे. 2-3 दिवसात अधिकाऱ्यांच्या गाड्या दिसल्या तर आम्ही बंद पाडू. मंत्र्यांचा ताफा पुण्यात दिसला तर आम्ही तो रोखू. आम्ही घोड्यावरती बसून आंदोलन केलं. हे आंदोलन करून प्रशासनाला हे सांगितलं आहे की तुम्ही पण सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. येत्या दोन दिवसांमध्ये हे बदल केले जातील असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे.’

जितेद्र आव्हाड यांच्याकडून ठाण्यात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन काटकसरीच्या आवाहवानानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान सह इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यालयापासून थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते बैलगाड्या, घोडागाडी घेऊन रस्त्यावरती उतरले होते.

यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी म्हटले की, अख्या देशाला संदेश आहे. या देशाची पातळी कुठे आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचे इलेक्शन होईपर्यंत चूप बसले आणि त्यानंतर हे सगळं नाटक सुरू झालेलं आहे. स्वत: परदेशी फिरायचं मात्र इथे लोक उपाशी आहेत. एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘वारे मोदी तेरा खेल… सस्ती दारू महंगा तेल’. तेलाचे भाव गगनाला गेले आहेत. काही फरक पडत नाही. एका-एका मंत्र्यांच्या मागे सात सात गाड्या फिरत आहेत. सगळा तमाशा करून टाकला आहे या देशाचा. देशाची परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून अशीच आहे. हे अजून याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाही. महागाई आणखी वाढणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.