लाच घेताना पकडताच दरदरून घाम फुटला, पैसे फेकले… गयावया… रस्त्यावरच ढसाढसा रडला; नाशिकमध्ये मोठी कारवाई
admin May 26, 2026 03:24 PM
[ad_1]

नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्याला छळणाऱ्या एका तलाठ्याला एसीबीने रंगेहात लाच घेताना पकडले आहे. आधी शेतकऱ्याचा छळ करून पदाचा तोरा दाखवणारा तलाठी जेव्हा एसीबीच्या जाळ्यात सापडला तेव्हा गयावया करू लागला. लहान मुलासारखा रस्त्यावरच ढसाढसा रडू लागला. हातातले पैसेही त्याने फेकून दिले. मला सोडा… मी पुन्हा असं करणार नाही, अशी वारंवार विनंती करत होता.

नाशिकच्या खामखेडा येथील ही घटना आहे. एका शेतकऱ्याने त्याच्या बहिणीचे हक्कसोड पत्र तयार केले होते. त्यामुळे त्याला सातबाराच्या उताऱ्यावरून बहिणीचे नाव कमी करायचे होते. त्यासाठी त्याने तलाठ्याकडे अर्ज केला होता. पण या शेतकऱ्याने तलाठ्याला खूश न केल्याने तलाठ्याने शेतकऱ्याच्या बहिणीऐवजी शेतकऱ्याचेच नाव कमी केले. त्याचा छळ करण्यासाठी तलाठ्याने हा कारनामा केला. त्यामुळे हा शेतकरी प्रचंड संताप्त झाला होता.

मध्यस्थामार्फत लाच मागितली

बहिणी ऐवजी तुम्ही माझं नाव सातबारा उताऱ्यावरून कमी केलं आहे. त्यामुळे ही चूक दुरुस्त करा, अशी वारंवार मागणी हा शेतकरी करत होता. मात्र, तलाठी पप्पू काशिनाथ सोनकांबळे त्याला काही दाद लागू देत नव्हता. महिना उलटला तरी तलाठ्याने काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर या तलाठ्याने मध्यस्थ प्रशांत दावल सोनवणे या व्यक्तीच्या मार्फत शेतकऱ्याकडे 5 हजार रुपयांची मागणी केली.

एक हजार दिले तरी…

या शेतकऱ्याला पीकपाणीच आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत होता. त्यात तलाठ्याने महिनाभर खेटा मारायला लावल्याने शेतकरी त्रस्त झाला होता. एक हजार रुपये लाच देऊनही तलाठ्याचे मन भरले नव्हते. त्यामुळे त्याने संतप्त होऊन या तलाठ्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्याने अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. आणि मदत करण्याची विनंती केली. शेतकऱ्याच्या विनंती वरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. आणि तलाठ्याला शेतकऱ्याकडून पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले. समोर एसीबीचे अधिकारी पाहून सोनकांबळेला चांगलाच दरदरून घाम फुटला होता.

पैसे फेकले

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठ्याला अटक केल्यानंतर त्याची वरातच काढली. तलाठी सोनकांबळेला वाहनात बसवण्यासाठी घेऊन जात असताना सोनकांबळेच्या अश्रूंचा बांध फुटला. तो गयावया करू लागला. ढसाढसा रडू लागला. व्हॅनमध्ये बसल्यावरही तो ढसाढसा रडत होता. एवढी चूक माफ करा म्हणून अर्जव करत होता. पण आता काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने लाच म्हणून स्वीकारलेले पैसे फेकून देऊन पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

अन् लोक धावले

सोनकांबळे मोठमोठ्याने ढसाढसा रडत होता. त्याची आरडाओरड पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एसीबीने तलाठी सोनकांबळेसह त्याचा मध्यस्थ असलेला सहकारी प्रशांत सोनवणे यालाही अटक केली. या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.