Ranveer Singh First Public Appearance : ‘धुरंधर’ चित्रपटाच्या दोनही भागांना मिळालेल्या अभूतकपूर्व यशामुळे अभिनेता रणवीर सिंह हा चांगलाच चर्चेत होता. त्याच्या कामाचे कौतुक तर झालेच, पण चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केल्याने रणवीरचा भाव बराच वधारला. त्याची लोकप्रियताही प्रचंड वाढली. मात्र आता हाच रणवीर पुन्हा चर्चेत आला तो फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटामुळे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) रणवीर सिंगविरोधात एक मोठं पाऊल उचललं आहे. FWICE ने त्याच्याविरोधात असहकाराचा अर्थात नॉन-कोऑपरेशनचा आदेश जारी केला आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आली असून हा वाद मिटेपर्यंत कोणीही त्याच्यासोबत काम करणार नाही.
मात्र या वादादरम्यान, रणवीर हा आता पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसला आहे. कालच रणवीर सिंह हा मुंबई विमानतळावर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षा व्यवस्था होती. या अभिनेत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा लूक पाहून तर अनेकांना धक्का बसलाय.
अभिनेता रणवीर सिंहवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याच्यासोबत यापुढे काम न करण्याचे आदेश एफडब्ल्यूआयसीईने (FWICE) चित्रपटसृष्टीला दिले आहेत. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ मधून रमवीरने अचानक माघार घेतल्यामुळे अभिनेत्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला. या सर्व वादादरम्यान काहीही न बोलणारा, मौन बाळगणारा रणवीर काल पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाला. त्याचा अंदाचही बराच बदलल्याचं दिसून आलं.
काळा मास्क, काळा गॉगल…
‘धुरंधर’पासून रणवीर सिंग चर्चेत असून आणि ‘डॉन 3’ मुळे त्याच्याबद्दलची चर्चा आणखीनच वाढली. या वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंह काल एअरपोर्टवर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षारक्षकांचं कडंही दिसून आलं. साधा पांढरा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातलेला रणवीर साध्या अंदाजात दिसला. मात्र त्यासोबत काळा गॉगल, आणि काळा मास्क लावल्याने त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता. गाडीतून उतरल्यावर तो थेट चालायला लागला, तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींशी ना तो काही बोलला ना फोटोसाठी पोझ दिली. वादाच्या दरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झालेल्य रणवीरच्या चेहऱ्यावर हास्य किंवा नेहमीचा खेळकरपणा नव्हता. तो आपल्या गाडीतून उतरून शांतपणे आत निघून गेला.
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
डॉन 3 चा वाद काय ?
दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाची घोषणाही झाली होती, पण नंतर रणवीरने यातून माघार घेतली. फरहान अख्तरच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचं काम आधीच सुरू झालं होतं आणि त्यावर अंदाजे 45 कोटी रुपये खर्चही झाला होता. पण रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फरहानने फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण FWICE कडे पाठवण्यात आले. आता, FWICE ने रणवीरविरुद्ध नॉन-कोऑपरेशन नोटीस बजावत त्याच्यावर बंदी घातली आहे.