ENGW vs INDW : इंग्लंडचा पलटवार, टीम इंडियाचा 6 बॉलमुळे गेम, नक्की काय झालं?
Tv9 Marathi May 31, 2026 10:45 PM

वुमन्स टीम इंडियाने टी 20I मालिकेत विजयी सलामी देत इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त सुरुवात केली होती. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 38 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून 4 मॅचच्या सीरिजमध्ये आपली बाजू आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र वुमन्स टीम इंडियाने ती संधी गमावली. टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आपली आघाडी कायम ठेवण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत सामना जिंकला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाला या सामन्यात 20 वी ओव्हर महागात पडली. या ओव्हरने सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सामन्यात नक्की काय झालं? जाणून घेऊयात.

शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचा गेम!

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करुन इंग्लंडला 18 ओव्हरपर्यंत बांधून ठेवलं होतं. मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये इंग्लंडने काही धावा जोडल्या. इंग्लंडच्या 18 ओव्हरमध्ये 6 आऊट 129 धावा झाल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडची जेमतेम 150 धावांपर्यंत पोहचण्याची शक्यता होती. मात्र उलटच झालं. इंग्लंडने 19 ओव्हरमध्ये 3 फोरच्या मदतीने एकूण 15 धावा केल्या. तर 20 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचा गेम झाला.

अरुंधती रेड्डी हीने इंग्लंडच्या डावातील शेवटच्या 6 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह एकूण 24 धावा लुटवल्या. फ्रेया कॅम्पने अरुंधतीची धुलाई करत फिनिशिंग टच दिला. कॅम्पने इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. कॅम्पने 13 बॉलमध्ये नॉट आऊट 39 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 168 धावांपर्यंत मजल मारली.

टीम इंडियाची बॅटिंग

स्मृती मंधाना पहिल्याच सामन्यात झिरोवर आऊट झाली होती. त्यामुळे स्मृतीकडून या सामन्यात मोठ्या खेळीची आशा होती. स्मृतीने संथ सुरुवात केली. त्यानंतर स्मृतीने गिअर बदलला. त्यामुळे टीम इंडियाला 9 ओव्हरमध्ये 70 धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र स्मृती 32 धावांवर आऊट झाली. त्यामुळे धावांना ब्रेक लागला. त्यामुळे टीम इंडियाला पुढील 6 ओव्हरमध्ये 39 धावाच जोडता आल्या. यास्तिका भाटीया हीने संथ खेळी केली. यास्तिकाने 36 चेंडूत 33 धावा जोडल्या. त्यामुळे यास्तिकाला 15 व्या ओव्हरमध्ये रिटायर्ड आऊट करावं लागलं.

12 च्या रनरेट धावांची गरज

टीम इंडियाला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 12 च्या रनरेटने 60 धावांची गरज होती. मात्र टीम इंडियाला इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर 33 धावाच जोडता आल्या. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. स्मृती आणि यास्तिका या दोघींव्यतिरिक्त टीम इंडियासाठी कुणालाही 30 पार मजल मारता आली नाही. तर इंग्लंडसाठी कॅप्टन चार्ली डीन, कॅम्प आणि लॉरेन बेल या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.