अहिल्यानगर : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघात रणधुमाळी पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने आज साईंच्या शिर्डीत अहिल्यानगर (शिर्डी) जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला. मात्र , या मेळाव्यात विद्यमान उबाठा सेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थितीत असल्याने जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत हे उपस्थित असतानाही वाकचौरे नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, शिवसेना (शिवसेना यूबीटी) नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदार महोदयांना कुठेही न जाण्याची विनंती केली.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच त्यांची अनुपस्थिती असल्याने चंद्रकांत खैरे यांनी भाषणातून त्यांना वेगळे न वागण्याचा सल्ला दिला. मेळाव्याला आज खासदार दिसत नाहीत, कदाचित कुठे गावाला गेले असतील. यापूर्वी देखील असे एकदा झालं होतं. त्यावेळी मी दोघा नवरा बायकोला दिल्लीला बोलावून चर्चा केली होती, त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात माझा सर्वात मोठा वाटा होता, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. त्यावेळी तुम्ही गेले, मात्र त्यानंतर उद्धव साहेबांनी तुम्हाला माफ केलं. आता आज तुम्ही पुन्हा सेनेचे खासदार झाला आहात. मात्र ते कार्यकर्त्यांना भेटत नाही अशा तक्रारी येतात, त्यांच्या अपरोक्ष हा मेळावा आज घेतल्याबद्दल अभिनंदन. ते आजही अधिकृतपणे कुठे गेले नाहीत अस मला वाटतं, त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती, बाकी त्यांची मर्जी, असे म्हणत चंदक्रांत खैरेंनी वाकचौरेंवर परखडपणे भाष्य केलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी अधिक जोमाने लढण्याचे आवाहन सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना केल्याचं अंबादास दानवे यांनी मेळाव्यातील भाषणात म्हटलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी राजकीय लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा