निधी शर्मा यांचे ‘जिथे मौन आकार घेते’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हिमालयातील निसर्ग, तिथली शांतता यांची अनुभूती देणारे प्रदर्शन रसिकांना वेगळा अनुभव देणारे ठरेल.
मुंबईच्या तीव्र उकाडय़ात मनाला शांतता आणि समाधानाचा एक सुखद विराम देणारे प्रदर्शन बघायला मिळण्याची संधी रसिक प्रेक्षकांना लाभणार आहे. चित्रकार निधी शर्मा यांच्या `Where Silence Becomes Form` (जिथे मौन आकार घेते) हे प्रदर्शन जहांगीर कलादालनात 9 जून ते 15 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. समकालीन भारतीय चित्रकार निधी शर्मा यांच्या नव्या कलाकृतींचा संग्रह यानिमित्ताने सादर केला जात आहे. विषय आणि सर्जनप्रक्रिया या दोन्ही स्तरांवर व्यक्त होणाऱया या कलाकृती स्थिरता (Stillness) या संकल्पनेवर आधारित आहेत. स्तरित पृष्ठभाग, धूसर क्षितिजे आणि संयत रंगसंगती यांच्या माध्यमातून ही चित्रं वेगळं अनुभवविश्व निर्माण करतात. रसिक प्रेक्षकांना आत्मचिंतन करायला उद्युक्त करणाऱया या कलाकृती अंतर्मनाला शांत करतात.
कोणत्याही कलाकाराची अभिव्यक्ती कलेसोबत विचार मांडणारी असते. निधी शर्मा यांचे हे प्रदर्शनही कलासक्त रसिकांना अंतर्मुख करीत एक चिंतनशील अनुभव देणारे ठरेल हे नक्की. या चित्रांमधून हिमालयातील वातावरण दर्शविणाऱया दृश्यांमधील शांतता, त्या निसर्गातील स्थिरता, अस्तित्वाच्या प्रवासाचा शोध घेतात. अॅक्रेलिक रंगांचे स्तर, धुक्यासारख्या मृदू रचना आणि मर्यादित आकृतिबंध यांच्या सहाय्याने कलाकार असे दृश्यविश्व निर्माण करतात. प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव घेतानाच या कलाकृती हे आकृतीबंध मनावर ठसले जातात. अनुभव कायम स्मरणात राहिल्यासारखा ठरतो. संवादांची भाषा अशा वेळी उणी ठरावी इतका मौनातून संवाद साधणाऱया या कलाकृती घडल्या आहेत.
समोर दिसणाऱ्या रंग,कला, दृश्य याचा पार अनुभव घेत हे दृश्य, हा कलाकृतीचा आकृतीबंध आपल्याला भावनिक, मानसिक शांतता देणारा ठरतो. हिमालयातल्या परिसराशी कलाकाराची सहज आणि आत्मीय नाळ या कलाकृतींमध्ये प्रकर्षाने जाणवते. या रचना वास्तववादी मांडणीच्या पलीकडे जाऊन स्मृती, प्रकाश आणि अवकाश यांच्या संगमाचा अनुभव घडवतात. या संग्रहात मोठय़ा आकाराच्या चित्रांसोबतच काही सूक्ष्म आणि आत्मीय अभ्यासचित्रांचाही समावेश आहे. सर्व कलाकृती एका शांत दृश्यभाषेशी जोडलेल्या आहेत, ज्यांची मुळे स्थिरता, स्मृती आणि अनुभूती यांत रुजलेली आहेत.
निधी शर्मा या समकालीन भारतीय कलाकार असून, त्यांच्या कलायात्रेचा केंद्रबिंदू स्थिरता, स्मृती आणि परिदृश्य यांचा भावनिक अनुभव म्हणून शोध घेणे हा आहे. त्या प्रामुख्याने अॅक्रेलिक माध्यमात कार्य करतात. त्यांच्या कलाकृतींना हिमालयीन भू-दृश्ये, विस्मृतीत गेलेली मंदिरे आणि उपस्थिती-अनुपस्थिती यांच्यातील बदलते संबंध यांपासून प्रेरणा मिळते.
गेल्या अनेक वर्षांत निधी शर्मा यांनी भारतासह परदेशात विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या एकल प्रदर्शनांसोबतच टोकियो, दुबई, हाँगकाँग आणि मुंबई येथील प्रमुख कला प्रदर्शनांमध्येही त्यांनी आपली कला सादर केली आहे.
निधी शर्मा यांची कलानिर्मिती प्रक्रिया सहज, अंतप्रेरणेवर आधारित आहे. त्यांच्या कलेची भाषा चित्रांच्या माध्यमातून अमूर्त प्रतलावर एक सहज समतोल निर्माण करणारी ठरते, हेच या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे.