मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, बच्चू कडू यांचे शिवसैनिकांना थेट आवाहन
Tv9 Marathi June 07, 2026 09:45 PM

राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्याचे मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल तसेच शिवसेना नेते व आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी इतर मुद्द्यांवर मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाषण करताना बच्चू कडू यांनी मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका असंही विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे यांचे कौतुक

शिवसेनेच्या मेळाव्यात भाषण करताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ‘माझ्यासमोर अनेक पक्षांमध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. आमचा स्वतंत्र पक्ष होता, अनेक पक्षांमध्ये जाऊन आम्हाला आमचं स्थान निर्माण करता आलं असतं. पण आम्हाला एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने मर्द वाटले. त्यांच्याशिवाय दुसरा मर्द नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे रात्री दोन वाजता मदतीसाठी हजर असतात. मुख्यमंत्री असतानाही रात्री अडीच वाजता शेतकऱ्यांना भेटणं ही एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे. हीच ओळख आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला न्यायची आहे.’

मंत्री चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका

पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, एक सेवाभावी माणूस आम्ही पाहत आहोत. शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा संवाद, त्याची प्रामाणिकता, त्याचे व्यक्तिमत्व नेण्याचे काम आम्हाला करावं लागणार आहे. मित्रांनो तुम्ही-आम्ही सत्तेत आहोत म्हणून सुस्त राहता कामा नये. सत्तेत आहोत म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल तर मंत्री जरी आपला असला तरी चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, अशी भूमिका भविष्यात घ्यावी लागणार आहे.

बच्चू कडू यांनी पुढे बोलताना, आमच्या धानाचे पैसे का भेटले नाहीत? धानाची खरेदी का झाली नाही. अजूनही लाडक्या बहि‍णींचे पैसे का भेटत नाहीत? या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत असंही विधान केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.