एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
महेश गलांडे June 07, 2026 11:43 PM

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार (Tehsildar) विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. तत्पूर्वी, जालना एसीबीने बीडमधील नेकनूर येथे जाऊन पोलीस अंमलदारास लाच घेताना अटक केली होती. मराठवाड्यातील या दोन्ही कारवायांमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर, चक्क तहसीलदारांना एबीसीने रंगेहात अटक केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांतूनही प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, विजय चव्हाण हे सोशल मीडियावर सक्रीय होते, ते आपण किती चांगलं काम करतो, जमिनीवरील लोकांसाठी आपण काम करत असल्याचा साळसूदपणाचा आव आणायचे. मात्र, एसीबीने त्यांना अटक केल्यामुळे आता त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. 

एबीसीने लाच प्रकरणात अटक केलेले विजय चव्हाण हे जवळपास 19 वर्षांपासून शासकीय सेवेत असून ते मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधारचे रहिवाशी आहेत. कंधार तालुक्यातील पानशेवडी गणातांडा येथील छोट्याश्या तांड्यातील विजय चव्हाण सर्वप्रथम एमपीएससीमधून पीएसआय पदावर नियुक्त झाले होते. डिसेंबर 2009 मध्ये मुंबईत ते पीएसआय पदावर रुजू झाले होते. मात्र, 2011 मध्ये त्यांनी पीएसआय पदाची नोकरी सोडली. स्पर्धा परीक्षेतून नायब तहसीदारपदी त्यांना पोस्टींग मिळाली. गणातांडासारख्या छोट्याशा गावातील पोरगा साहेब झाल्याचा आनंद गावातील, तालुक्यातील लोकांना होता, त्यांचा अभिमानही वाटायचा. मात्र, लाचखोरी प्रकरणात अडकल्याने आता विजय चव्हाण यांची प्रतिमा समाजात, जनमानसांत मलिन झाली आहे. 

विजय चव्हाण हे कंधार तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार होते. त्यानंतर, अॅडिशनल तहसीलदार, तसेच कंधार नगरपालिकेत CO म्हणून 2021 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यासोबतच, मुखेड येथील नगर पालिकेतही मुख्याधिकारी म्हणून ते रुजू होते. दरम्यान, त्यांच्या सेवेचा जास्तीत जास्त कार्यकाळ हा नांदेड जिल्ह्यातील राहिला असून ऑगस्ट 2024 पासून ते जालन्यातील अंबड येथे कर्तव्यावर आहेत

फेसबुकवर 33 हजार फॉलोअर्स, व्हिडिओ शेअर

विजय चव्हाण सोशल मीडियाव चांगलेच एक्टीव्ह असून त्यांचे फेसबुकवर 33 हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे, ते आपल्या कामाची माहितीही सोशल मीडियातून शेअर करत असतात. विशेष म्हणजे अटकेच्या एक दिवस अगोदरच त्यांनी फेसबुकवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्याच्या शेतात बसून ते रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याचं सांगत आहेत. पाहणी, संवाद आणि तोडगा काढल्याचं त्यांनी म्हटलं. यातून ते लोकांसाठी तत्पर असल्याचं दाखवत होते. मात्र, तब्बल 6.40 लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

तहसीलदार विजय चव्हाण यांनी कंधार येथील लॉ कॉलेजमधून 2020 साली कायद्याची पदवी घेतली असून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एलएलएम) ही करत असल्याचं त्यांनी त्यांच्या फेसबुकमधून सांगितलं आहे. 

मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.