कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा June 08, 2026 04:13 PM

अमरावती : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने सध्या शासनाकडून जनहिताच्या कुठल्याही घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र, राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाने काही अटी व शर्तींसह शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. तर, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारमधील घटक पक्षाचे आमदार असलेल्या बच्चू कडूंनी (Bachhu kadu) या शेतकरी कर्जमाफीवर नाराजी दर्शवली असून शेतकऱ्याना (Farmer) सानुग्रह अनुदान 50 हजारांऐवजी 1 लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केलीय.

नाही म्हणणाऱ्या सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली, हे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे शक्य झाले. शेतकऱ्याना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे. ज्याच्याकडे अडीच लाख, तीन लाख आहे, त्यांना माफ होणार नाही. शेतकऱ्यांनी OTS केल्यामुळे 50 हजार कर्ज आहे, आणि व्याज दोन लाख रुपयांपर्यंत आहे. मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेसासारखी कर्जमाफी करावी. सतत दोन वर्षे नियमित कर्ज भरले तरच प्रोत्साहन निधी देणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. पण हे सगळ्यांना द्यावे आणि ते 50 हजार ऐवजी एक लाख रुपये द्यावे, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. .

जुनीच कर्जमाफी अद्याप काहींना मिळाली नाही

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारने हा प्रोत्साहन निधी देत राहावं. जुनी कर्जमाफी झाली त्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही आणि प्रोत्साहन निधी पण मिळाला नाही, याकडेही बच्चू कडू यांनी लक्ष वेधले. OTS करतांना दोन वर्षांची अट रद्द करावी, दिव्यांग बांधवांना सरसकट कर्जमाफी करावी. मी शिवसैनिक आहे.. पण आमच्या डोक्यातून शेतकरी आणि दिव्यांग जाणार नाहीत, असे कडू यांनी स्पष्टपणे सांगितले.

कर्जमाफी शासनाने केलीय, बच्चू कडूने नाही

कर्जमाफीमध्ये दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे. जी कर्जमाफी झाली ती सरकारने केलीय बच्चू कडूने नाही. त्यामुळे अनेकांना गैरसमज झाला आहे, बच्चू कडू सरकारमध्ये आहे म्हणून प्रत्येक गोष्ट मला विचारून होत नाही. अनेक जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची होळी करत आहेत, त्यांना तो अधिकार आहे. ज्यांना होळी करायची आहे ते करा, ज्यांना पूजा करायची त्यांनी पूजा करावी. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहोत, असेही बच्चू कडूंनी म्हटलं. 

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.